कामगार वसाहतीचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:43 PM2019-09-24T21:43:10+5:302019-09-24T21:43:15+5:30
मालदाभाडी : बंद स्टार्च प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष, ५०० कुटुंबांचा प्रश्न
जामनेर : मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद पडला असून, गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले होते. तरीही कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. मंगळवारी प्रकल्पासमोरील कामगार वसाहतीचा वीज पुरवठा बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने खंडित केला. यामुळे सुमारे पाचशे कुटुंबांवर उमासमारीची वेळ आली आहे.
खासगी तत्त्वावर सुरु असलेल्या या प्रकल्पात ३५० कायम व सुमारे १५० हंगामी कर्मचारी काम करीत होते. जानेवारी २०१९ पासून प्रकल्प बंद असून, एप्रिलपासून कायम कर्मचाºयांना वेतन नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. कायम कर्मचारी असल्याने सोडूनही जाता येत नाही. प्रकल्प सुरू करणार अथवा नाही याबाबत व्ययवस्थापनाने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा थकीत पगारासह देणी परत करावी, या आशयाचे निवेदन कर्मचाºयांनी यापूर्वीच प्रकल्प उपाध्यक्षांना दिले होते.
वीज वितरण कंपनीची प्रकल्पाकडे ६५ लाख, कर्मचारी वसाहतीकडे १ लाख २९ हजार व पाणी पुरवठा विभागाकडे ४ लाख ६१ हजार थकबाकी असल्याची माहिती मिळाली.
मंगळवारी कंपनीने कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. यावेळी महिलांनी त्यांना वीज खंडित न करण्याबाबत विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कंपनीने यापूर्वीच प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
दिवाळीपूर्वी पालकमंत्री व शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.