आरोग्य विभागाच्या समितीची प्रयोगशाळेत पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:59+5:302021-06-29T04:12:59+5:30
जळगाव : आरोग्य सेवा संचालनालयाकडून त्रिसदस्यीय समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड निदान चाचणी प्रयोगशाळेत पाहणी केली. ...
जळगाव : आरोग्य सेवा संचालनालयाकडून त्रिसदस्यीय समितीने सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड निदान चाचणी प्रयोगशाळेत पाहणी केली. कोविड तपासणीपासून ते निदानापर्यंत प्रक्रिया कशी राबविली जाते, याची ही समिती माहिती जाणून घेत असून, मंगळवारी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत.
आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत पत्र पाठवून या समितीला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. २१ जून रोजी हे पत्र जिल्ह्याला प्राप्त झाले होते. त्यानुसार या समितीत पॅथॉलॉजी प्रोग्रॅम ऑफिसर प्रवीण के. एस., ऑपरेशन मॅनेजर राजेश बोसे आणि डाटा ॲनालिस्ट महेश शेटे या तीन अधिकाऱ्यांनी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाहणी केली.
डेल्टाची खबरदारी, तिसऱ्या लाटेची तयारी?
या समितीने जळगाव आणि उस्मानाबाद या ठिकाणी प्रयोगशाळांची तपासणी केली आहे. जळगावात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यासाठी पूर्वतयारी म्हणून विशेष बाब म्हणून ही समिती जळगावात पाठविण्यात आली होती का, असाही एक प्रश्न समोर आला आहे. ही समिती पाहणीचा अहवाल व प्रयोगशाळेत कुठल्या मशिनरीची कमतरता आहे, त्याची माहिती आरोग्य विभागाला देणार आहेत.
काय तपासले?
समितीने प्रयोगशाळेत येणारे कोरोनाचे नमुने कसे येतात, त्यांची वाहतूक कशी होते, ते कुठे ठेवले जातात. किती मशिन्स आहेत, त्या बंद पडल्या तर पर्यायी व्यवस्था काय मनुष्यबळ प्रशिक्षित आहे का, या बाबींची तपासणी केली. प्रयोगशाळेत आणखी एक आरटीपीसीआर मशीन द्यावे, अशी मागणी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी समितीकडे केली आहे. यासह समितीने जीएमसीतील स्वॅब तपासणी रूमची सर्व तपासणी करून विविध प्रश्न विचारून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचीही भेट घेतली.