प्रवेश पत्र नसल्याने ९ परीक्षार्थी स्टेनो परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:52 PM2019-07-25T12:52:10+5:302019-07-25T12:53:08+5:30
भुसावळच्या क्लास चालकाने केली नाही त्रुटींची पूर्तता
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या टंकलेखन आणि लघुलेखनच्या (स्टेनो) परीक्षेदरम्यान स्टेनो परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) न मिळाल्यामुळे जळगावातील केंद्रावरील ९ विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून भुसावळ येथील क्लास चालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना हा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील पुष्पांजली या खाजगी टंकलेखन क्लास चालकाने त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली. मात्र या क्लासमध्ये काही त्रुटी असल्याने संबंधित क्लास चालकाला परिषदेने सुनावणीसाठी तीनवेळा पुणे येथे बोलविले. तरीदेखील क्लास चालक सुनावणीला गेले नाही. त्यामुळे शेवटी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुष्पांजली सेंटर खंडीत (ब्लॉक) केले. सेंटरच ब्लॉक झाल्याने तेथील ९ परीक्षार्थींना प्रवेश पत्रही (हॉल तिकीट) मिळाले नाही.
बुधवार, २४ रोजी सकाळी परीक्षार्थी स्टेनोची परीक्षा देण्यासाठी जळगावातील विद्या निकेतन शाळेतील केंद्रावर पोहचले. मात्र हॉल तिकीट नसल्याने परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या ९ जणांना परीक्षा देता आली नाही.
याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून संबंधित क्लास चालकाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला गेला. मात्र वारंवार संपर्क साधूनही क्लास चालकाने प्रतिसाद दिला नसल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला संबंधित माहिती देऊन मार्गदर्शन मागविले आहे.
या संदर्भात ‘लोकमत’नेही क्लास चालकाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.