जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:49 AM2020-06-12T11:49:07+5:302020-06-12T11:49:32+5:30
रक्षा खडसे : मृतदेह रुग्णालयातच आढळणे गंभीर
जळगाव : जिल्ह्यात सक्षम नेतृत्वच उरलेले नाही. सक्षम नेतृत्वाखाली जर हे प्रशासन चालले असते तर कोरोनाचा भडका उडाला नसता, असे सांगून प्रशासनाने कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याबाबतची कारणे शोधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. प्रशासनाने आमचे ऐकले नसल्याचे त्या म्हणाल्या.
कोविड रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह काही दिवसांनी त्याच रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळला, ही बाब गंभीर असून जिल्ह्यात सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्यानेच हे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केळी उत्पादकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी त्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. कोविड रुग्णालय हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. ते शहराबाहेर असायला हवे होते. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयातच कोविड रुग्णालय केल्याने याठिकाणी अनेक प्रकारचे रुग्ण येतात, त्यांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते.
-आम्ही प्रशासनाला पूर्वीही सांगत होतो की, जे कर्मचारी रात्रंदिवस काम करताहेत त्यांनाही ताण असू शकतो. त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि कोरोनाचा एवढा विस्फोट का होतोय?
-यामागची कारणे शोधा. केवळ कुणी कर्मचारी चुकला म्हणून त्याच्यावर कारवाई करून प्रश्न मिटणार नाही तर चुका का झाल्या, याचाही शोध घेतला पाहिजे.
-आम्ही यासाठीच सुरुवातीपासून सांगत होतो की, लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. मात्र प्रशासनाने आमचे ऐकले नाही, असे त्या म्हणाल्या.