चार आमदारांचे गाव तरीही सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:08 PM2017-10-02T16:08:20+5:302017-10-02T16:14:05+5:30
अमळनेर तालुक्यातील अमळगावात शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.२ - तालुक्यातील अमळगाव हे 3 माजी आमदारांचे गाव तर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे आजोळ आहे. या गावातील शिक्षण, आरोग्य तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाºया अवैध धंदे बंद होत नसल्याने ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
अमळगाव हे माजी शिक्षणमंत्री स्व. शरदचंद्रिका पाटील, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, माजी आमदार मधुकर पाटील यांचे मूळ गाव आहे, तर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे आजोळ आहे. मात्र त्यानंतरही गावात अजूनही स्मशानभूमी नाही. गावातील नदी पुलाचा भराव खचला असून कठडे तुटले आहेत. ग्रामिण रुग्णालयात औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. हगणदरीची समस्या बिकट आहे. त्याच ठिकाणी गावातील बाजार भरतो. गावात सट्टा चालतो, भरवस्तीत दारू दुकाने आहेत. मराठी शाळा हगणदरीत भरते, रेशन दुकानात सुरळीत अन्न धान्य मिळत नसल्याने येथील नागरिक श्याम सोनवणे यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केल ेआहे.
तसेच तलाठ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाळू चोरांच्या विरोधात अनंत निकम यांनी ही तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. अवैध वाळू वाहतुकदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी निकम यांनी केली आहे.