बाजारीकरणामुळे उत्तम नाटकांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:46 AM2019-09-15T11:46:08+5:302019-09-15T11:47:25+5:30
विजयकुमार सैतवाल। जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, ...
विजयकुमार सैतवाल।
जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, तेथेच आहे. आज सामाजिक आशय व धार्मिकता यांची सांगड नाही की राजकारणावर नाट्य लेखन होत नाही. केवळ बाजारीकरण वाढत असल्याने उत्तम नाट्य निर्मिती होत नाही व त्यातून उत्तम अभिनयही घडून येत नाही, अशी खंत लेखक व नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नाट्यलेखन कार्यशाळेच्या निमित्त गज्वी हे जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचित केली. या वेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेले हा संवाद...
प्रश्न- आजच्या तरुण पिढीमध्ये नाट्य गुण दिसून येतात का?
उत्तर- उत्तम नाट्य निर्मितीसाठी आंगीक, आहार्य, वाचिक, सात्वीक या नाटकासाठीच्या चार गुणांसोबत तात्वीक गुणही आवश्यक आहे. मात्र तात्वीक भूमिका असलेले नाटक येत नाही आणि दुसरीकडे आजच्या तरुणांना झटपट प्रसिद्धी हवी आहे. अलौकिकतेसाठी कष्ट हवे असतात. मात्र तेच आज दिसत नाही.
प्रश्न- आजच्या नाटकांमध्ये समकालील प्रश्न दिसून येतात का?
उत्तर - नाही. १९७५मध्ये आणीबाणीचा विषय असो की, जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्मितीचा विषय किंवा बाबरी मशिद पाडली, मुंबई बॉम्बस्फोट, भारत-पाकिस्तान संबंध यावर कोणते नाटक आले? समकालीन प्रश्नांना घेऊन नाट्य निर्मिती होण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आवश्यक असतो.
अभिरुची बदलावी
पूर्वीपासून ज्या पद्धतीने नाट्य निर्मिती होते, तीच परंपरा आज कायम आहे. विरोधात जाऊन लेखन करायला कोणी तयार नाही. प्रेक्षकांनीही अभिरुची बदलून नवीन नाटक स्वीकारायला हवे. त्यातून नवीन रंगभूमी तयार होऊ शकेल.
परिवर्तनशील लेखन
नाट्य क्षेत्रात जो कष्ट करतो, तोच टिकतो. हलके-फुलके लिहायला कष्ट लागत नाही. आज देशाबद्दल एवढ्या आत्मीयतेने बोलले जाते, मात्र ते लिखानात का येत नाही. त्याबद्दल कोठे नाटक दिसते. तरुण पिढी झटपट प्रसिद्धीच्या मागे लागते, मात्र ही झटपट प्रसिद्धी त्याच गतीने विस्मृतीत जाते. चिरकाल नाट्यनिर्मिती व आपला ठसा उमटविण्यासाठी परिवर्तनशील लेख असणे गरजेचे आहे.