जळगावात एक लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:43 PM2018-10-11T12:43:25+5:302018-10-11T12:44:03+5:30
दागिने व रोख रक्कम लंपास
जळगाव : इंद्रप्रस्थ नगरातील वंदना चंद्रशेखर तारे (वय ५८) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा १ लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वंदना तारे या इंद्रप्रस्थ नगरातील दत्त मंदिराजवळ प्लॉट क्र.२६ मध्ये एकट्याच वास्तव्याला आहेत. मुलगा धनंजय व मुलगी भाग्यश्री हे दोन्हीजण कल्याण येथे नोकरीला असल्याने वंदना तारे या घराला कुलुप लावून २३ सप्टेबर रोजी दुपारी १ वाजता मुलाकडे कल्याण येथे गेल्या होत्या. तेथून बुधवारी सकाळी सात वाजता परत आल्या असता घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप गायब झालेले होते तर कडीकोयंडे तुटलेले होते. कपाट उघडे होते तर त्यातील सामान बाहेर फेकलेला होता.
असा गेला ऐवज चोरीला
७ हजार रुपये रोख, २९ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोनसाखळी, ४५ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची मंगलपोत, ९ हजार रुपये किमतीची कानातील तीन ग्रॅमची सोन्याचे रिंग, ९ हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स व तीन हजार रुपये किमतीचा एक सोन्याचा शिक्का असा १ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर वंदना तारे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक दिक्षा लोकाडे करीत आहेत.