लाडक्या गणरायाचे उद्या आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:03 PM2020-08-21T12:03:35+5:302020-08-21T12:03:44+5:30
खरेदीसाठी लगबग : कोरोनाच्या सावटातही गणेश भक्तांमध्ये चैतन्य
जळगाव : यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. मांगल्याचे प्रतिक असलेला सर्वांचा गणपती बाप्पा देखील त्यातून सुटला नाही. गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जाणार असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र यंदाही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. शनिवारी गणरायाची स्थापना होणार आहे. शहरातील मुख्य बाजार पेठेत गर्दी होऊ नये म्हणून दुकाने लावली गेलेली नाहीत. मात्र शहरातील गणेश कॉलनी, सागर पार्क, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी दुकाने लावण्यात आली आहेत. त्याठिकाणी गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग कायम आहे.
सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या एका दिवसावर आले असून बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत जोरदार खरेदी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आली असून खरेदीसाठी गणेशभक्तांची या दुकानांकडे वळत आहे.
बाजारपेठ सजली
बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली असून मूर्ती व इतर साहित्यांच्या विक्रीसाठी गणेश कॉलनी, शिवतीर्थ मैदान, सागर पार्क, अजिंठा चौफुली या परिसरात शेकडो स्टॉल थाटण्यात आले असून ग्राहकांकडूनही जोरदार खरेदी केली जात आहे.
मंडळांची तयारी
यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात होत आहे. गणपतीच्या दहा दिवसातील उत्साहावर कोरोनाची काळी छाया असली तरी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गर्दी टाळून साध्या पद्धतीने हा सोहळा होणार आहे.
शहरातील प्रमुख मंडळांनी छोटे मंडप, मिरवणुका न काढण्याचे ठरवले आहे. तसेच आरती करताना किंवा पुजा करताना देखील शारीरिक अंतर आणि प्रशासनाचे नियम पाळण्यात येणार असल्याचे मंडळांच्यावतीने सांगण्यात आले. अनेक मंडळांचे मंडप तयार झाले असून पदाधिकारी, कार्यकर्ते रात्रंदिवस काम करताना दिसत आहे.
अजिंठा चौफु लीवर विक्रेत्यांनी थाटली दुकाने
राष्टÑीय महामार्गावरील अजिंठा चौकात गणेश मूर्ती विक्रेत्यांनी तीन दिवसांपासूनच आपली दुकाने थाटायला सुरुवात केली. गुरूवारी अजिंठा चौफुलीपासून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.
गौरीचे मुखवटेही तयार
गणपती पाठोपाठ गौरी, महालक्ष्मी देखील येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखवट्यांची आणि मुर्त्यांची देखील तयारी केली जात आहे. यात शाडू मातीची मुर्ती आणि मुखवटे, स्टॅण्ड, बाळाच्या मुर्त्या, कापडापासून बनवलेली मुर्ती देखील उपलब्ध आहे. त्यासोबतच पाऊले देखील मुर्तीकारांनी बनवली आहेत. शाडुमातीचे दोन मुखवटे, आणि बाळ जवळपास १३०० रुपयांना तर पीओपीमध्ये १४०० ते १७०० रुपयांना उपलब्ध आहेत.
मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात मूर्तीकार व्यस्त
गणेशोत्सवाचा दरवर्षी वाढत जाणारा भाविकांचा उत्साह पाहता, उत्सवाच्या दोन ते तीन महिन्यांआधीच मूर्तीकार मूर्ती बनविण्यास सुरुवात करतात. त्यानुसार शनिवारी विराजमान होणाºया बाप्पाच्या मूर्तींवर शेवटच्या हात फिरविण्यास मूर्तीकार व्यस्त असून त्यांचे रात्रंदिवस काम सुरू आहे. तयार झालेल्या मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.