‘त्या’ महिला डॉक्टरने लिहिली आत्महत्येपूर्वी ११ पानांची चिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:56 AM2017-08-04T11:56:23+5:302017-08-04T11:58:17+5:30
वाघळूद, ता.धरणगाव येथील सासर व कठोरा, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. स्वाती अभिजीत पाटील (वय २३) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा पानांची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती व त्यात सासरकडील मंडळी गर्भ श्रीमंत असतानाही माहेरुन महागड्या चैनीच्या वस्तू आणाव्यात म्हणून कसा छळ करण्यात येत होता याबाबत चिठ्ठीतउल्लेख केला आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.४,वाघळूद, ता.धरणगाव येथील सासर व कठोरा, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. स्वाती अभिजीत पाटील (वय २३) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा पानांची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती व त्यात सासरकडील मंडळी गर्भ श्रीमंत असतानाही माहेरुन महागड्या चैनीच्या वस्तू आणाव्यात म्हणून कसा छळ करण्यात येत होता याबाबत चिठ्ठीतउल्लेख केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या चिठ्ठया जप्त केल्या आहेत.
डॉ.स्वाती पाटील यांनी २५ जुलै रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरात वरच्या मजल्यावर पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कठोरा, ता.जळगाव येथे घडली होती. स्वाती पाटील यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी बोराडी, ता.शिरपूर येथे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले व आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्यांची डॉक्टर म्हणून नोंदणीही झाली होती.
हुंडा व सोने देऊनही अपेक्षा अपूर्णच
स्वाती पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, वडील सुनील पाटील यांनी लग्नात मनाप्रमाणे हुंडा व सात तोळे सोने दिले होते. तरीही काय दिले तुझ्या वडीलांनी असे टोमणे सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मिराबाई यांच्याकडून मारले जात होते. आता वाशिंग मशिन, फ्रीज व बेडरुमध्ये फर्निचर तसेच महागडा मोबाईल आदी वस्तू तुझ्या वडीलांना घ्यायला सांग, असा आग्रह त्यांच्याकडून होता. आपल्याकडे इतका पैसा असतानाही शेतकरी असलेल्या वडीलांकडे किती मागायचे. सर्व मलाच दिले तर मागे भाऊ पण आहे, त्याला काय देणार असे स्वाती या वारंवार सांगत होत्या. तुमच्या प्रियासारखी मी एकटी नाही. बर दिले तरी तुमची नवीन अपेक्षा असतेच. तरीही दररोज काही ना काही कारणाने छळ सुरुच होता. पती डॉ.अभिजीत यांना सांगितले तर तू माझ्यामागे कटकट लावू नको असे सांगतात. पतीच ऐकून घेणार नाही तर मग मी कोणाकडे सांगू असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
खूप छान गिफ्ट दिले मला
डियर अभिजीत, खूप छान गिफ्ट दिले तुम्ही मला थर्टी फर्स्टचे. मला रडताना पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना. कारण लिहून यासाठी सांगते की, तुम्हाला तर माझ्याशी बोलायला वेळच नाही. बीझी लोक ना तुम्ही. मी बोलले की, तुम्हाला किरकिर वाटते. एक डॉक्टर असूनही माझ्या नैसर्गिक अडचणी तुम्ही समजून घेतल्या नाहीत, असेही चिठ्ठीत लिहिले आहे.
पती, सासू व सासरे फरार
आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी तीन दिवसानंतर कुटुंबाला आढळली व ती त्यांनी पोलिसांकडे सादर केली. त्यामुळे पती डॉ.अभिजीत पाटील, सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मिराबाई पाटील या तिघांविरुध्द २८ जुलै रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी डी.बी.पाटील, जितेंद्र पाटील यांचे एक पथक वाघळूद, पिंप्री व धरणगाव येथे तिघांच्या शोधार्थ गेले असता दवाखाना व घराला कुलूप आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
बैठक ठरली होती निष्फळ
स्वाती पाटील यांचा सासरच्यांकडून छळ होत असल्याने दोन्हीकडील कुटुंब व नातेवाईकांची बैठक घेण्याचा निर्णय २२ जुलै रोजी झाला २४ रोजी आजोबांकडे झुरखेडा, ता.धरणगाव येथे बैठक झाली. याबैठकीत वडीलांचे ऐकूण घेण्यात आले नाही. इकडे वडीलांची जेमतेम परिस्थिती तर दुसरीकडे सुशिक्षीत व गर्भश्रीमंत असतानाही सासरच्यांकडून नवनवीन अपेक्षा यामुळे प्रचंड नैराश्य आल्याने दुसºयाच दिवशी स्वाती यांनी घरात आत्महत्या केली.