लक्ष्मी आली घरा तोचि आनंदाची दिवाळी दसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:26+5:302021-07-10T04:12:26+5:30
पिंपळगाव बुद्रुक येथील राहुल अरुण देसले हे लखनऊ येथे आर्मीत कार्यरत आहेत. त्यांना पहिली कन्या झाल्याने फुलांच्या पाकळ्या टाकून ...
पिंपळगाव बुद्रुक येथील
राहुल अरुण देसले हे लखनऊ येथे आर्मीत कार्यरत आहेत. त्यांना पहिली कन्या झाल्याने फुलांच्या पाकळ्या टाकून कन्येचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. पेढे वाटून आनंद व्यक्त करत मुलीचे स्वागत केले. लक्ष्मी आली घरा तोचि दिवाळी दसरा. असे आनंदमय चित्र दिसून आले.
दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर मातेसह कन्येला घरी आणले. शुक्रवारी मुलगी जन्माला आल्याने तिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. घरात पूर्णपणे सजावट करून फुलांच्या पाकळ्या खाली टाकून राहुल देसले व शुभांगी देसले यांनी आपल्याला पहिली कन्या झाली म्हणून आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. नातेवाईक, परिवार, नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. राहुल देसले हे २०१३मध्ये जळगाव येथे आर्मीत भरती झाले होते. राजस्थान, पंजाब व आता लखनऊ येथे ते देशाची सेवा बजावत कार्यरत आहेत. घराची परिस्थिती साधारण असल्याने आई, वडील आणि मोठा भाऊ शेती करतात. त्यांना बहीण नाही. त्यामुळे मुलगी झाल्यानंतर इतका आनंद झाला की, त्यांनी गावात पेढे वाटले .राहुल देसले यांचे दोन वर्षांपूर्वी डोंगराळे येथील शुभांगीबाई यांच्याशी लग्न झाले होते. शुभांगीबाईंना मिलिटरी हॉस्पिटल, लखनऊ येथे ॲडमिट करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुलगी जन्माला आली. त्यांनी एवढे मोठे स्वागताचे आनंदात नियोजन केले. शुक्रवार म्हणजे देवीचा वार असल्याने साक्षात लक्ष्मी आली. आमच्या घरी त्यांनी लक्ष्मीच नाव ठेवले आहे. या आनंदमय सोहळ्याने परिवारात समाधानाचे वातावरण दिसून आले.
फोटो — पिंपळगाव बुद्रुक येथे आनंद सोहळ्यात मुलीसोबत माता, पिता.