एका वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा केवळ भूलथापा - सुरेशदादा जैन यांचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:16 PM2018-07-27T13:16:18+5:302018-07-27T13:17:28+5:30
विरोधकांच्या आडमुठेपणामुळेच विकास थांबला
जळगाव : शहराच्या विकासाला २००१ पासून शाप लागला आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून ज्यांची राज्य व केंद्रात सत्ता आहे. त्यांच्याक डून शहराच्या विकासात अडथळा आणला जात आहे. तरी मात्र, माझे मित्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून एका वर्षातच शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे. एका वर्षात शहराचा विकासाचे आश्वासन केवळ भूलथापा असून, वर्षभरात शहराचा विकास केवळ अलीबाबाची जादू असून अशी आश्वासने देण्यात विरोधक ‘माहिर’ असल्याचा घणाघात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी रात्री यश लॉन येथे झालेल्या सभेत विरोधकांवर केला.
या सभेत सुरेशदादा जैन यांनी जोरदार फटकेबाजी केली. सभेत होममिनीस्टर फेम भावजी आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या इंदिराताई पाटील, महानंदा पाटील यांच्यासह प्रभाग ८ मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
आम्हाला २०० कोटी द्या, आम्ही विकास करुन दाखवतो
गिरीश महाजन यांच्याकडून भाजपाला सत्ता मिळाल्यास शहराचा विकासासाठी २०० कोटी रुपये देवू असे आमीष जळगावकरांना दिले जात आहे. शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपये द्यायचेच असतील तर त्यासाठी सत्तेची काय गरज आहे ?, मनपात आमची सत्ता आहे. आमच्याकडे २०० रुपये कोटी द्या आम्हीही शहराचा विकास करुन दाखवतो असे आव्हान सुरेशदादा जैन यांनी दिले.
अडचणी येत राहतील मात्र, आमचा संघर्ष कायम राहील
शहराच्या विकासात अडचणी येत राहतील, विरोधकांकडून विकासकामांना अडवणूक होत राहील. मात्र, मी जळगावकरांशी बांधील आहे. जळगाव माझी भूमी आहे, आणि त्या भूमीच्या विकास करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे.
विकासामध्ये कितीही अडथळा आणला तरी आमचा संघर्ष कायम राहणार आहे. सर्व अडचणींवर मात करून जळगावकरांचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. २४ तास जळगावकरांच्या सेवेसाठी मी कटीबध्द असल्याचेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.
लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला अन् शाप लागला...
सध्या महानगरपालिकेची जी आर्थिक स्थिती आहे. त्यापेक्षा कठीण परिस्थिती १९८५ मध्ये शहराच्या तत्कालीन नगरपालिकेची होती. त्यावेळी जळगावकरांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला शहराच्या विकासासाठी संधी दिली. जळगावकरांनी दिलेल्या आशिर्वादानंतर शहराचा विकास १९८५ ते २००१ पर्यंत नियमित झाला. मात्र, २००१ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, शहराच्या विकासाला शाप लागल्याचे सुरेशदादा जैन म्हणाले.
जळगावच्या विकासाला लागलेला शाप आजपर्यंत कायम असून , गेल्या चार वर्षात ज्यांची सत्ता राज्यात व केंद्रात आहे. त्यांनी केवळ शहराचा विकास रोखण्यासाठीच प्रयत्न केला असल्याचा आरोप सुरेशदादा यांनी केला. २५ कोटीच्या निधी केवळ त्यांच्याच आडमुठेपणामुळेच अखर्चित असून मनपाच्या विकासाला अडथळा आणण्याचे काम सध्या सुरु असल्याचा आरोपही सुरेशदादा यांनी केला.
जामनेरला २०० कोटी तर जळगावला केवळ २० कोटी
जर सत्ता आली तर आम्ही शहराचा विकास करु अशी भूमिका जर का मुख्यमंत्र्यांची असेल तर ती संविधानाच्या विरोधात आहे. कारण मुख्यमंत्री जेव्हा आपल्या पदाची शपथ घेतात तेव्हा कोणत्याही शहराला सापत्न वागणूक देणार नाही असे म्हणतात. मात्र, निधीचा विचार करताना जामनेरला २०० कोटी तर जळगावला केवळ २० कोटी.., असा दुजाभाव सध्या केला जात असल्याचेही सुरेशदादा जैन म्हणाले.
शिवसेनेच्या शिवशक्ती विरोधात धनशक्ती - आदेश बांदेकर
आदेश बांदेकर म्हणाले, जळगावची मनपा निवडणूक ही ऐतिहासीक असून या ठिकाणी शिवसेनेची शिवशक्ती विरोधात धनशक्ती उभी ठाकली आहे. मात्र, इतिहासात जर का डोकावून पाहिले तर शिवशक्ती विरोधात कोणत्याही धनशक्तीचा विजय झालेला नाही. मात्र, या निवडणुकीत कोणीही गाफील न राहता शिवसेनेच्या शिवशक्तीच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आवाहन बांदेकर यांनी केले. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस असून ३ आॅगस्ट रोजी जळगाव मनपावर भगवा ध्वज फडकवून त्यांना वाढदिवसाची भेट द्या असे आवाहनही बांदेकर यांनी केले.