चोरट्यांनी लांबविले लाखाचे लग्नाचे दागिने
By admin | Published: March 20, 2017 12:28 AM2017-03-20T00:28:19+5:302017-03-20T00:28:19+5:30
समतानगरातील पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर : मजुरी करुन पोटाला चिमटा देत बनविले होते २३ ग्रॅम सोने व ७ तोळे चांदीचे दागिने
जळगाव : मजुरी करुन पै अन् पै गोळा केले. घरात किंवा बॅँकेत पैसे ठेवले तर ते खर्च होतात, मुलांच्या लग्नासाठी धावपळ नको म्हणून २३ ग्रॅम सोने व ७ तोळे चांदीचे दागिने बनवून घरात ठेवले आणि पुन्हा कष्ट करण्यासाठी पुण्याला गेलेल्या पवार कुटूंबाच्या घरातून चोरट्यांनी कष्टाची कमाई लुटून नेल्याची घटना समता नगरात रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
कैलास हरिश्चंद्र पवार यांचे समता नगरातील बेलदार वाड्यात पत्र्याचे घर आहे. पत्नी संगिता, मुलगा योगेश, आकाश व मुलगी आशिका आदी सर्व जण गवंडी काम करुन पोट भरतात. मुलगी आशिका व मुलगा योगेश या दोघांचे यंदा लग्न करण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी दागिने घेतले होते.
कोठीचे कुलूप उघडून दागिने लांबविले
घरात चोरी झाल्याचे समजताच पवार हे तातडीने पुण्याहून जळगावकडे निघाले. शनिवारी रात्री साडे अकरा वाजता ते घरी पोहचले. घरात पाहणी केली असता कपाट उघडे होते तर कोठीत कापडात गुंडाळून ठेवलेले दागिने गायब झाले होते. पवार यांनी ही घटना सकाळी रामानंद नगर पोलिसांनी कळवली असता सहायक निरीक्षक अरविंद भोळे, उपनिरीक्षक राजेश घोळवे, अरुण निकुंभ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरीची पध्दत पाहता जाणकार व ओळखीच्याच व्यक्तीने हा प्रकार केला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना यावेळी पाचारण करण्यात आले होते.
शेजारच्या घराचेही तोडले कुलूप
पवार यांच्या शेजारीच राहणारे भिमराव मुरलीधर मोरे यांच्या बंद घराचेही कुलूप चोरट्यांनी तोडले आहे. घरात कोणीही राहत नसल्याने येथे चोरट्यांची निराशा झाली. दरम्यान, एक महिनाआधीही याच परिसरात जितेंद्र विनायक सपकाळे यांच्याही बंद घरातून चोरट्यांनी ८ हजार रुपये लांबविले होते. सपकाळे एका दिवसासाठी परिवारासह बाहेर गावी गेले होते, त्यामुळे घर बंद होते. मागचा दरवाजा उघडून किचनमध्ये ठेवलेल्या डब्यातून चोरट्यांनी ही रक्कम लांबविली होती.
रोजगारासाठी पुण्यात गेले अन् चोरट्यांनी डाव साधला...
पवार कुटूंब गवंडी काम करते. शहरात रोजगार मिळत नसल्याने ते मुळशी, जि.पुणे येथे गेले होते. तेथे एका हॉटेलच्या बांधकामाच्या ठिकाणी हे कुटूंब काम करीत होते.त्यामुळे ५ ते १८ मार्च या कालावधीत त्यांच्या समता नगरातील घराला कुलूप होते.
पवार यांच्या शेजारी राहणारे गणेश भरत कुमावत हे शनिवारी सकाळी ब्रश करत असताना समोरील पवार यांच्या घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. पवार कुटूंब पुण्याला गेले असताना दरवाजा कसा उघडा आहे, म्हणून त्यांनी चौकशीसाठी घराकडे धाव घेतली असता कपाटही उघडे होते तर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते.
त्यांनी हा प्रकार पवार यांची बहिण चंद्रकला चव्हाण यांना सांगितला तर त्याच वेळी दुसरी बहिण अरुणाबाई मोहीते या नातवासाठी दूध पावडर घेण्यासाठी येत होत्या.त्यांनी ही घटना पवारांना कळवली.