शिरसोली आकाशवाणी परिसरात प्रचंड आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:26 PM2019-01-25T12:26:20+5:302019-01-25T12:26:51+5:30
रात्री उशिरापर्यंत जंगलात पेटलेला होता वनवा, प्रशासनाची तारांबळ
शिरसोली ता. जळगाव : आकाशवाणी प्रक्षेपण केंद्रातील ४० एकर जंगलातील गवताला गुरुवारी दुपारी आग लागली. यात १५ ते २० एकरातील गवत आणि झाडे जळून खाक झाली. जैन उद्योग समूह व मनपाच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, झाडीमुळे अग्निशमन बंबांना आतमध्ये शिरता येत नसल्याने बाहेरुनच पाण्याचे फवारे मारता आले. दुपारी लागलेली ही आग रात्री उशिरापर्यंत धगधगतच होती.
शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राचा चाळीस एकराचा परिसर असून या परिसरात सर्वत्र गवतासह दाट झाडी आहे. आकाशवाणी केंद्राच्या चारही बाजूने संरक्षक भिंती आहे. या परिसरात प्रवेशास मनाई आहे.
गुरवारी २४ रोजी दुपारी ३.३० वाजात अकाशवाणी केंद्राचे इंजिनियर युवराज नेमाडे व जितेंद्र नेमाडे अर्र्थिंग मेझरमेंटचे रीडींग घेण्यासाठी गेले असता आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लागलीच त्यांनी वरिष्ठांना व पोलीस पाटील यांना कळविले. संभाव्य धोका टाळण्यासाठी ११ केव्हीचे २ ट्रान्सफ्रार्मर बंद करून कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणाऱ्या टॉवरचे कनेक्शन बंद करुन काही वेळ प्रक्षेपणही बंद ठेवण्यात आले होते.
जवळच्या नागरिकांना इशारा
आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राच्या मागील बाजूस संरक्षण भिंतीला लागून अनेक घरे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे. आगीची माहिती जाणून घेण्यासाठी मंडल आधिकारी गुरव, तलाठी उत्तम नन्नवरे, औद्योगिक पोलीस स्टेशनचे जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, समाधान बारी यांनी भेटी देउन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.