गिरणा धरणाच्या साठ्यात दोन दिवसात मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:10 PM2019-08-04T23:10:34+5:302019-08-04T23:11:03+5:30
२० टक्क्यांनजीक पोहचला साठा
दापोरा, जि. जळगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गिरणा धरणात असलेल्या अल्प पाणी साठ्याने चिंता वाढविली होती. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व एरंडोल उपविभागाचे उपभियंता एम.आर. अत्तरदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गिरणा धरणाचे उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने गिरणा धरणावरील चणकापूर ६९ टक्के, अर्जुनसागर (पूनंद) ६९ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर ६० टक्के, माणिकपुंज या सारख्या धरणाचे पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे या धरणातून संध्याकाळ पर्यंत २५००० क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा धरणात सुरू असल्याने सोमवारी सकाळी सहावाजेपर्यंत धरणाचा पाणी साठा २० टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. पावासाचा असाच जोर राहिल्यास वरील धरणातील पाण्याने गिरणा धरणाचे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
गिरणा धरणाच्या उगम क्षेत्रात कसमा पट्ट्यातील कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात पावसाचा जोर कायम असून पुढे वाढ होऊन भविष्यातील जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.