विद्यमान संचालक मंडळाची शेवटची सर्वसाधारण सभा ३० रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:21+5:302021-09-19T04:18:21+5:30
जळगाव : जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये संघाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या विविध ...
जळगाव : जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये संघाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमध्ये करावयाच्या गुंतवणुकीस मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाची मुदत यापूर्वीच संपली असून आगामी काळात निवडणुका होण्याची शक्यता असल्याने विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची सर्वसाधारण सभा ठरू शकते. या सभेच्या विषय पत्रिकेवर १२ विषय राहणार असून ही सभा नवीन अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सहा महिन्यात दुसरी सर्वसाधारण सभा
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरला आणि निवडणुका, बैठकांवर निर्बंध आले. त्यामुळे इतर सहकारी संस्थांप्रमाणे जिल्हा दूध संघाची बैठक लांबली. गेल्या वर्षी संसर्गामुळे ती होऊ शकली नाही. काहीसे निर्बंध शिथिल झाल्यानंतर २९ मार्च २०२१ रोजी सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर आता सहाच महिन्यात आता लगेच दुसरी सभा ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.
नवीन अध्यक्षांच्या उपस्थितीत सभा
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत गेल्या वर्षीच संपली आहे, मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर बंधने आल्याने निवडणूक होऊ शकली नाही. आता येत्या काही दिवसात संघाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची सभा ठरू शकते. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी संघाच्या अध्यक्षपदी वसंतराव मोरे यांची निवड झाली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच सभा राहणार आहे.
नवीन विविध प्रकल्पांवर चर्चा
दूध संघाच्यावतीने अद्ययावत नवीन पशुखाद्य कारखाना उभारणी, लोणी व बटर साठवणुकीसाठी प्रत्येकी २ हजार लीटर क्षमतेचे गोदाम तयार करण्यात येणार आहे. यासोबतच २० टन क्षमतेचा दूध पावडर बनविण्याचा कारखाना उभारण्यात येणार असून आइस्क्रीम व चीज प्लँटला चालना दिली जाणार आहे. शिवाय पेढा, रसगुल्ला, गुलाबजामून, कलाकंद इत्यादी मिठाई तयार करण्यासाठी संयंत्र बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पांचा विचार करता आइस्क्रीम, चीज, नवीन दूध भुकटी प्लँट, नवीन पशुखाद्य कारखाना इत्यादी उभारणीसाठी करावयाच्या गुंतवणुकीस या सभेत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.