शेवटच्या अर्ध्या तासात माघारीसाठी अपक्ष उमेदवारांची मनपात धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:33 PM2018-07-18T12:33:49+5:302018-07-18T12:34:35+5:30
उशिरा आलेल्यांची माघार नाकारली
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत काही मोजक्या उमेदवारांनी माघार घेतली मात्र, दुपारी २ ते ३ या एका तासात अनेक उमेदवारांनी माघार घेतली. तर काही उमेदवार मुदत संपल्यानंतर मनपात पोहचल्याने ते माघार घेवू शकले नाही.
अपक्ष उमेदवारांची रात्रीपासून मनधरणी
सोमवारपर्यंत २४ उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, १७६ हून अधिक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अनेक उमेदवारांचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता होती.
सोमवारी रात्री काहीअपक्ष उमेदवारांच्या घरी जावून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. हे प्रकार मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे शेवटच्या अर्धातासात अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली.
‘डमी’ उमेदवारांनी सकाळीच घेतली माघार
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी दरम्यान अर्जामध्ये त्रुटी राहिल्यास उमेदवारांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी खबरदारी म्हणून आपल्याच कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ‘सबकुछ ओके’ झाल्यामुळे ‘डमी’ उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली.
एक तास शिल्लक असतानाही पाहिली फोनची वाट
माघारीसाठी आपल्या विनवण्या केल्या जातील या अपेक्षेने काही काही उमेदवार मनपाच्या आवारात सकाळपासून उपस्थित होते. मात्र, कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून फोन किंवा कोणतेही आश्वासन न मिळाल्यामुळे शेवटच्या तासात अर्ज मागे घेतले.
तर काहींनी आपली उमेदवारी कायम ठेवली.
मुदत संपल्यानंतरही आले उमेदवार, मात्र प्रवेश नाकारला
मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र, अनेक उमेदवार हे दुपारी ३ वाजेनंतर मनपात दाखल झाले.
यामध्ये प्रभाग ३ क च्या अपक्ष उमेदवार रुपाली वाघ, संग्राम सूर्यवंशी यांच्यासह अनेक उमेदवारांचा समावेश होता.
दुपारी ३ वाजता निवडणूक कक्षाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. त्यानंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात आला नाही.
त्यामुळे त्यांना माघार घेता आली नाही.
वेळ कमी राहिला, लवकर घेऊन या
माघारीची वेळ जसजसी जवळ येत होती तसतशी एका पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाºयांची लगबग वाढताना दिसून आली. नेते आपल्या कार्यकर्त्यांना अमूक या उमेदवारास माघारीसाठी लवकर घेऊन या, अशा सूचना देत होते. प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल ते होईल, मात्र आज माघारीच्या अखेरच्या दिवशी आपल्या उमेदवाराविरोधात असलेले जास्तीत जास्त उमेदवार कमी कसे करता येतील, त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी ‘साम, दाम, दंड’या मंत्राचे पालन होत असल्याचे चित्र होते. मनधरणी झाल्यानंतर त्याला माघारीस नेण्यासाठी चारचाकी वाहनांचीदेखील तयारी करून ठेवलेली होती. हे सर्व करीत असताना हातातील घड्याळातील वेळेकडे लक्ष होते.
माघार घेणाºयांसाठी प्रवेशव्दारापर्यंत चारचाकीची व्यवस्था
प्रमुख पक्षांमधील काही नाराज पदाधिकाºयांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घ्यावी यासाठी महत्वाच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतलेला दिसून आला. अपक्ष उमेदवारांचे मन वळविण्यात यश मिळाल्यानंतर संबधित उमेदवाराला मनपाच्या प्रवेशव्दारापर्यंत सोडण्यासाठी चारचाकीची व्यवस्था करून देण्यात आली होती.
काही अपक्षांना माघार न घेण्यासाठीही विनवण्या
एकीकडे काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाºयांकडून मनधरणी सुरु असताना, काही अपक्ष उमेदवारांना निवडणूक लढवावी यासाठी मनधरणी सुरु असल्याचेही मनपाच्या परिसरात दिसून आले. अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्यास विरोधातील उमेदवाराचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही अनेकांनी अपक्ष उमेदवार रिंगणात रहावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.