कुºहा-हरदो जि.प.शाळेला अखेरची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:37 AM2018-08-28T00:37:13+5:302018-08-28T00:41:04+5:30
बोदवड तालुक्यातील कुºहा- हरदो जि.प.शाळेची जीर्ण अवस्थेमुळे दूरवस्था झाली असून भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचे संपूर्ण छत नेस्तनाबूत झाले असून तीन वर्ग खोल्यांची भग्नावस्था झाल्याने आणि याबाबत वारंवार पाठपुरावा आणि तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बोदवड जि. जळगाव : तालुक्यातील कुºहा - हरदो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची अत्यंत दूरवस्था झाल्याने ती अखेरची घटका मोजत आहे. शाळेचे संपूर्ण छत मोडकळीस आल्याने वर्ग खोल्या उघड्या पडल्या आहेत. पावसाचे पाणी थेट वर्गांमध्ये येत असल्याने त्यांची भग्नावस्था झाली आहे. परिणामी शाळेच्या विद्यार्थ्याना भर पावसाळ्यात उघड्यावर शिकवण्याची पाळी शिक्षकांवर आली आहे.
दरम्यान, वारंवार पत्र व्यवहार आणि पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष झाले असून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असतांना यात बोदवड तालुक्याला ठेंगा दाखविण्यात आल्याची संतप्त भावना जनतेकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून डिजीटल शाळेकडे वाटचाल करीत आहेत तर दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे.
तालुक्यातील कुºहा हरदो येथे जिल्हा परिषेदेची पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण देणारी व सन १९१८ मध्ये ब्रिटिश कालीन बांधकाम झालेली शाळा असून या शाळेत गतवर्षी सुमारे दोनशे पाच विद्यार्थी पटावर होते. मात्र यंदा दूरवस्थेमुळे १९० विद्यार्थीच राहिले असून त्यांना बसण्यासाठी एकूण सात वर्ग खोल्या आहेत. तथापि त्यातील तीन वर्ग खोल्या पूर्ण पडक्या झाल्या आहेत, त्यांचे छप्पर पूर्ण उडालेले आहे, सदर तीन वर्ग खोल्यांचे कौलारू छत गेल्या वर्षांपासून गळके झाले आहे. त्यातून नेहमीच पावसाळ्यात पाणी टपकत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे मुष्कील होते.
या शाळेच्या दुरूस्तीसाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा ही केला. नंतर गटविकास अधिकारी यांनीही पाहणी केली. काहीच उपाययोजना होत नसल्याने एक दिवस शाळेला कुलूप ही ठोकून पाहिले पण आश्वासनांशिवाय पदरात काहीच मिळाले नाही.
दरम्यानच्या काळात या शाळेच्या वर्ग खोल्यांची स्थिती आणखी बिकट बनली असून दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या शाळेचे पूर्ण कौलारू छत पडले आहे. परिणामी ही शाळा भग्नावस्थेत उभी आहे. वर्गात बसायला जागा नसल्याने धोका नको म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक त्यांना पटांगणात जमिनीवर बसवून शिकवत आहेत. तर वर्ग खोल्यात कौले आणि ताट्यांचे ुतुकडे पावसामुळे थेट बाकड्यांवर येऊन पडले असून खोल्यांची दुर्दशा झाली आहे. शाळेची ही दूरवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.