गेल्या वर्षी ८१९ लोकांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:03+5:302021-01-01T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात मार्च २०१९ ते एप्रिल २०२० या वर्षभराच्या कालावधीत ८१९ लोकांना सर्पदंश झाला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात मार्च २०१९ ते एप्रिल २०२० या वर्षभराच्या कालावधीत ८१९ लोकांना सर्पदंश झाला होता. त्यापैकी तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे. यंदा मात्र, कोरोनामुळे सिव्हील रुग्णालयाचा मध्यंतरी उडालेला गोंधळ व त्यामुळे रुग्णांच्या नोंदीतही गोंधळाचे वातावरण असून यंदाची पुरेशी माहिती यंत्रणेकडे उपलब्ध नाही.
जिल्ह्यातही अनेक विषारी सापांचा वावर असून नागरिकांनी उपचारांपेक्षा दक्षता घेणे अधिक गरजेचे असल्याचे सर्पमित्र सांगतात. अनेक वेळा सर्पचावल्यानंतर नेमके काय करावे, याबाबत जागृती नसल्यानेही अनेकांना प्राण गमवावे लागू शकतात, असे चित्र आहे. जिल्ह्यात ३० प्रकारचे विविध सर्प आढळून येतात. गेल्या वर्षभराचे चित्र बघितल्यास सर्पदंशामुळे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. तातडीने उपचार मिळाल्यास सर्पदंश झालेल्याचा जीव वाचू शकतो, म्हणून तातडीने वैद्यकीय उपचार द्यावे, असे आवाहन सर्पमित्र, आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत असते.
सिव्हिल नसल्याने गोंधळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे एप्रिल महिन्यात कोविड घोषित झाल्यानंतर नॉन कोविड यंत्रणा विस्कळीत झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी आयुर्वेद महाविद्यालयालयात आपात्कालीन विभाग हलवून ही व्यवस्था झाली होती. आता शासकीय रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे.
साप चावताच काय काळजी घ्यावी
सर्पदंश झाल्यानंतर सुरूवातीचा एक तास हा वेदनादायी असतो. अशा स्थितीत जास्त चालणे, बोलणे टाळावे, सुरूवातीला जखम स्वच्छ धुवावी, त्यानंतर दंश झालेल्या ठिकाणापासून एक फूट अंतरावर तातडीने एक आवळपट्टी बांधावी, रक्तपुरवठा थांबेल व बाधित, दूषित रक्त हे हृदयापर्यंत जाणार नाही. दंश झालेल्या व्यक्तीस झोपू देऊ नये, तो झोपल्यानंतर त्याला काय त्रास होतोय हे समजणार नाही. अशी माहिती सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी दिली.
जिल्ह्यात आढळणारे साप
जिल्ह्यात ३० प्रकारचे साप आढळून येतात. त्यात विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सर्प आढळून येतात. त्यात विषारी सापांमध्ये घोणस, फुरसे, पोवळा, चापडा, तर निमविषारीमध्ये मांजऱ्या, अंडीखाऊ, जाडरेती तर बिनविषारी सापांमध्ये धामण्या, तस्कर, डुकऱ्या, कवड्या, गवत्या, अजगर या सापांचा समावेश असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी दिली.
जिल्ह्यात लसींचा साठा किती उपलब्ध?
जिल्ह्यात सर्पदंशावर लस आणि पुरेसी औषधी उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे. औषधांअभावी रुग्णाला ताटकळत रहावे लागत नाही, असेही यंत्रणेचे म्हणणे आहेे.