अवकाळी पावसाचे गेल्या वर्षाचे नुकसान अनुदान त्वरित द्यावे --भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:14 PM2020-09-24T16:14:13+5:302020-09-24T16:14:41+5:30
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी
यावल : गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना भाजपतर्फे देण्यात आले.
खरीप २०१९च्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला होता. त्यावेळी तत्कालीन भाजप सरकारने शेतकºयांना नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजार रुपयेप्रमाणे अनुदान मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला होता. निधी वाटपात शासकीय यंत्रणेने नाव एका व्यक्तीचे तर खाते नंबर दुसºयाचा, तर काहींना अनुदान वाटपच केले नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आजपर्यंत साधारण २१०० शेतकºयांना निधी मिळालेला नाही. हा निधी मुदतीच्या आत शासनास परत पाठवण्यात आल्याची कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील २१०० शेतकºयांना विनाकारण तहसील कार्यालयामध्ये फेºया माराव्या लागत आहेत व मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा निधी परत पाठवण्याची घाई का करण्यात आली. तसेच अनुदान वाटपात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. हा हलगर्जीपणा केलेल्या कर्मचाºयांची चौकशी करून संबंधित कर्मचारी, तहसीलदार यांची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी. अन्यथा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे पंधरवड्यानंतर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जि.प.चे माजी सदस्य भरत महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे. यावल शहराध्यक्ष नीलेश गडे. संजय सराफ, अनंत नेहते, मच्छिंद्र चौधरी, किशोर पाटील, परेश नाईक आदींच्या स्वाक्षºया आहेत.