जळगावातील समांतर रस्त्यांसाठी अखेर १०० कोटी मंजूर - एकनाथराव खडसे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:43 PM2018-07-29T12:43:05+5:302018-07-29T12:43:54+5:30
३९ कोटी नंतर मिळणार
जळगाव : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्त्याच्या कामास अंतीम मंजुरी मिळाली असून यासाठी १०० कोटी १८ लाखाचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
शहरातील त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी झालेल्या या पत्रपरिषदेस खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची उपस्थिती होती. यावेळी खडसे यांंनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे जळगावात सभेनिमित्त आले असताना आपण स्वत: हा प्रश्न सर्वप्रथम त्यांच्याकडे मांडला होता. यानंतर स्वत: मी तसेच खासदार पाटील व रक्षा खडसे अशा तिघांनी पाठपुरवा केला व चार बैठक ाही आतापर्यंत गडकरी यांच्यासोबत झाल्या.
मनपाच्या अंतर्गत असलेला समांतर रस्त्यांच्या कामासाठी काही तांत्रिक अडचणीही आल्या. शेवटी या प्रयत्नांना यश आले आहे.
केळी उत्पादकांसाठी १०० कोटी मंजूर
केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी कृषिमंत्र्याची भेट घेतल्यावर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीक विम्याचे १०० कोटी रुपये मंजूर झाले असून ही रक्कम त्यांना लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
‘अमृत’ची शिफारस माझीच
जळगाव आणि भुसावळ या शहरात अमृत योजनेची शिफारस कॅबीनेटमध्ये असताना मीच केली होती, असेही खडसे यांनी सांगितले.
पथदिव्यांसाठी जिल्ह्यातील ४ शहरे दत्तक
केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी आणलेल्या योजनेनुसार भुसावळ, सावदा, मुक्ताईनगर आणि बोदवड ही ४ शहरे एलइडी पथदिवे योजनेत दत्तक दिली जाणार आहे. हा करार दोन- तीन दिवसात होणार आहे. यानुसार संबंधित कंपनी बिलाच्या जबाबदारीसह लाईट बसविणे व दुरुस्ती ही कामे पाहणार आहे. एलईडीमुळे नगरपालिकेच्या बिलाची जी बचत होईल, त्यातून कंपनी आपला खर्च आणि नफा मिळवणार आहे. जळगावातही ही योजना आणण्याचा विचार असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पत्र प्राप्त
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतच्या समांतर रस्त्याच्या कामाच्या मंजुरीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (नही) पत्र २७ जुलै रोजी खडसे यांना प्राप्त झाले आहे. हे पत्रही त्यांनी पत्रपरिषदेत दाखवले. दरम्यान इतर वाढीव कामांसाठी ३९ कोटीही नंतर मिळणार असल्याची माहितीही खडसे यांनी दिली.
मेहरुण तलाव सुशोभीकरणासाठी ५० लाख
मेहरुण तलावाच्या सुशोभीकरणासाठी मागे ४ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले होते. नुकतेच यापैकी ५० लाख बांधकाम विभागास प्राप्त झाले असून टेंडर प्रक्रीयेनंतर टप्प्या टप्प्याने इतर रक्कम मिळणार असल्याचे खडसे म्हणाले. मी जनतेच्या मनात आहे, त्यामुळे जाहिरातीत फोटो नसला तरी मला काहीही फरक पडत नसल्याचेही खडसे यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.
टोल न आकारण्याची मागणी
समांतर रस्ते होत असल्याने जळगावकरांचा महत्वाचा एक प्रश्न सुटत असला तरी या रस्त्यावर टोलचा भार देवू नये, अशी मागणी आपण गडकरी यांच्याकडे केली असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही यावेळी खडसे म्हणाले.