डी.एल.एड.च्या रिक्त जागांसाठी विशेष ऑनलाईन फेरीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:31 PM2021-01-11T19:31:27+5:302021-01-11T19:31:37+5:30
१४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार : ११ ते १५ जानेवारीपर्यंत होणार पडताळणी
जळगाव : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फे-या घेण्यात आल्या आहेत. तथापि, अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुन्हा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून १४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करता येणार आहे.
प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश दिला जाणार आहे.यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५ टक्के गुणासह) आहे.
रिक्त जागांसाठी अशी आहे प्रवेश प्रक्रिया
११ ते १४ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावयाचे आहे. ११ ते १५ जानेवारीपर्यंत पडताळणी अधिका-यांकडून प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी केली जाईल. ११ ते १६ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगिनमधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करुन स्वत:चे प्रवेशपत्र काढून घ्यावयाचे आहे. ११ ते २० जानेवारीपर्यंत प्राचार्य, संबंधित अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करुन स्वत:चे लॉगिनमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अॅडमिट करुन घ्यावयाचे आहे.
हे देखील भरू शकतात अर्ज
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रुव करुन घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रुव केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल / लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.