एलसीबीची ‘बीट’ संकल्पना मोडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:01 PM2018-12-25T12:01:39+5:302018-12-25T12:02:20+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीची बीट संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारपासून मोडीत काढली. त्यामुळे आता एलसीबीचा प्रत्येक कर्मचारी जिल्ह्यात कुठेही जावून कारवाई करु शकणार आहे. दरम्यान, बीट संकल्पना मोडित काढल्यामुळे कर्मचाºयांची मात्र गोची झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेत बीट संकल्पना होती. प्रत्येक तालुक्याचे एक या प्रमाणे पंधरा तालुक्यांचे पंधरा व जळगाव शहर १ असे १६ बीट स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात कार्यरत होते. त्या बीटसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्तीला होते. त्या कर्मचाºयांवर आपआपल्या बीटमधील अवैध धंदे, गुन्हे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती. चोरी, घरफोडी, खून, जबरी चोरी, दरोडा, सोनसाखळी लांबविणे, बॅग लांबविणे अपहरण यासारखे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अशा दोन यंत्रणा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणत होते.
गुन्हे उघडकीस आले नाहीत तर त्याला संबंधित बीटचे कर्मचारी जबाबदार धरले जायचे. आता एखाद्या गुन्ह्याचा तपास करावयाचा असेल तर पोलीस निरीक्षक आपल्या अधिकारात अधिकारी व कर्मचाºयाची नियुक्ती करतील. त्यांनी गुन्हा उघडकीस आणला तर त्याचे श्रेय त्याला, प्रलंबित राहिला तरही त्याची जबाबदारी त्या कर्मचाºयावर राहणार आहे.
अनेक प्रकरणांना बसणार चाप
बीट संकल्पनेमुळे सबंधित कर्मचाºयाचे आपआपल्या बीटमध्ये खबरे व स्वतंत्र अशी यंत्रणा तयार झाली होती. त्याशिवाय आर्थिक व्यवहारही ठरलेले होते. आता या सर्वच बाबींना चपराक बसणार आहे. त्याशिवाय अवैध धंदे चालकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.
दरम्यान, बीट संकल्पना मोडीत निघाल्याने कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी. रोहोम यांनी सोमवारी सकाळी बीट कर्मचाºयांची बैठक घेऊन बीट संकल्पना यापुढे राहणार नसल्याची जाणीव करुन दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र जिल्हा आहे, त्यामुळे कोणताही कर्मचारी जिल्ह्यात काम करेल अशा सूचना त्यांनी दिल्या. या वृत्तास रोहोम यांनीही दुजोरा दिला.
बीट हा विषय कायद्यातच नाही. त्यामुळे हा विषय यापुढे राहणार नाही. प्रत्येक कर्मचाºयाने त्याला मिळालेल्या माहितीच्या आधारावर जिल्ह्यात काम करावे. कोणाला काय काम द्यायचे याची जबाबदारी निरीक्षकाची आहे. त्यांनी कर्मचाºयांकडून चांगले काम करुन घ्यावे व अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवावे हीच अपेक्षा आहे.
-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक