भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:42 PM2019-12-16T15:42:24+5:302019-12-16T15:47:26+5:30
साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, साचलेल्या डबकीत डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
जल है तो कल है, पाणी जपून वापरा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन पाणी वाचवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत असते मात्र यात शासनाच्या नियमांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत खो दिलेला दिसून येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आधीही काम करत असताना या जलवाहिनीला गळती लागली होती. भर उन्हाळ्यामध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी होत होती. महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारामार्फत लगेच जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली होती व त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. यानंतर हे कार्य आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येत आहे. याविषयी संबंधित जलशुद्धीकरण केंद्र साकेगावचे उप अभियंता पी.पी. पाटील यांना वारंवार सूचना करून व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.
लाखो लीटर पाण्याची नासाडी
जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करण्यात जलवाहिनीला याठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. नेमके यास गळती लागली असून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो व यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते.
साचलेल्या डबक्यामुळे आरोग्य धोक्यात
गळतीमुळे मोठे डबके तयार झाले आहे. हेच पाणी रस्त्यावर येते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्यां रुग्ण संख्येने वाढ होत आहे.
लहान मुले व गुरे फसतात डबक्यात
साचलेल्या पाण्यामुळे मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांना तसेच गुराढोरांना अंदाज येत नाही. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लहान मुलं व गुर अडकले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
त्वरित दुरुस्ती करावी
साकेगावजवळील महामार्गावर वाय पॉईंट जवळ येता-जाता लाखो लोकांच्या निदर्शनास येणाºया पाण्याचा अपव्यय पाहून भुसावळ शहरामध्ये आठ दहा दिवसात पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र याठिकाणी पाणी मुबलक असतानासुद्धा फक्त तांत्रिक कारण सांगून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया नागरिकांना मात्र हे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. त्वरित पाण्याची गळती दुरुस्त करावी व पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा जनसामान्यात व्यक्त करण्यात येत आहेत.