लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:17+5:302021-07-04T04:12:17+5:30

इंटरनेट, तसेच तांत्रिक अडचणींमुळे होतोय प्रचंड मनस्ताप जळगाव : परिवहन विभागाने लर्निंग लायसन्स घरबसल्या काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासह ...

Learning license offline only; Crowd again at the RTO office | लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी

लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे; आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी

Next

इंटरनेट, तसेच तांत्रिक अडचणींमुळे होतोय प्रचंड मनस्ताप

जळगाव : परिवहन विभागाने लर्निंग लायसन्स घरबसल्या काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासह वितरक स्तरावरच वाहनांना क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील लर्निंग लायसन्सचा निर्णय जनतेसाठी हिताचा असला तरी तांत्रिक अडचणी पाहता त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे लायसन्स ऑनलाइनऐवजी ऑफलाइनच बरे असे आता लायसन्स काढणारेही म्हणायला लागले आहेत.

केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. त्यात घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे व वाहन वितरकांच्या स्तरावरच वाहन क्रमांक जारी करणे याचा समावेश आहे. त्यापैकी घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ लागली आहे. सुरुवातीलाच त्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक आता आरटीओ कार्यालयातच जायला लागले असून, तेथे गर्दी होऊ लागली आहे. राज्य शासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचे परिपत्रक काढून दुसऱ्या आठवड्यापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. जळगाव आरटीओ कार्यालयातून आतापर्यंत फक्त १८ जणांना ऑनलाइन लायसन्स देण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने नागरिक थेट कार्यालयात येऊन एजंटच्या माध्यमातून कामे करायला लागले.

उमेदवार वेगळाच, परीक्षेला दुसऱ्या उमेदवारासाठी आग्रह

ज्याला लायसन्स काढायचे आहे, त्याच्याऐवजी दुसराच उमेदवार परीक्षा देत असल्याचा प्रकार उघड होत आहे. आरटीओ कार्यालयात डमी उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न काहींनी केले. मात्र, अधिकाऱ्यांनी तो प्रकार हाणून पाडला आहे. घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढतानादेखील प्रत्यक्ष उमेदवार वेगळा व अर्ज भरणारी व्यक्ती दुसरीच असते. अर्थात दुसऱ्याच्या मदतीने हे काम करून घेतले जात असल्याचे उघड होत आहे. काही उमेदवार तर परीक्षेसाठी दुसऱ्या व्यक्तीला पुढे करण्याबाबत आरटीओ कर्मचाऱ्यांकडेच आग्रह धरतात.

ऑनलाइनसाठी अडचणी काय?

ऑनलाइन लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयाने स्वतंत्र वेबसाइट तयार केलेली आहे. यात कधी सर्व्हरमध्ये अडचणी येतात, तर कधी बायोमेट्रिक करायला अडचणी येतात. त्यासाठी आरटीओ कार्यालयातच जावे लागते. नाव, जन्मतारीख टाकल्यानंतर फोटो अपलोड होत नाहीत. ही सुविधा राज्यभर असल्याने ऑनलाइन लायसन्स काढणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे एकाच वेळी सर्व्हरवर लोड येत असल्याने साइट बंद पडते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक जण आरटीओ कार्यालयात येऊन एजंटच्या माध्यमातून अर्ज करून भरून घेत आहेत. एजंट कधी रात्री, तर कधी सकाळी अर्ज भरतात. त्याशिवाय इंटरनेटची गतीही जास्त असते. मोबाइल किंवा घरच्या संगणकात फारशी गती मिळत नाही.

१८ ऑनलाइन लायसन्स

ही सुविधा सुरू होऊन काही दिवसच झाले. महिना होत नाही तितक्यात अडचणी यायला लागल्या आहेत. आतापर्यंत फक्त १८ लायसन्स ऑनलाइन देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात ही सुविधा शासनाने सुरू केली. बायोमेट्रिक, तसेच सर्व्हरमध्ये अडचणी येणे अशा तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन लायसन्स निघू शकत नाही.

कोट...

ऑनलाइन लायसन्ससाठी तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या लायसन्स मिळायला अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित एजन्सी एनआयसी व परिवहन आयुक्त कार्यालयाला कळविण्यात आले आहे. जळगावच नाही, तर संपूर्ण राज्यात या अडचणी येऊ लागल्या आहेत. लवकरच सुविधा पूर्ववत होऊन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.

-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

किती लायसन्स दिले

वर्ष लर्निंग पक्के

२०१९ ५५८७८ २२१५९

२०२० ७७७९५ २३५६४

२०२१ ४३१२६ १८३३८

..म्हणून आरटीओ कार्यालय गाठले

फोटो

- ऑनलाइन लायसन्स काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असली तरी ती फारशी समाधानकारक नाही. अनेक अडचणी येत असल्याने त्याचा उपयोग होत नाही. कधी इंटरनेट तर कधी बायोमेट्रिकसाठी आरटीओ कार्यालयात थंब करायला जावेच लागते. त्यामुळे ऑनलाइनऐवजी पूर्वी जशी सुविधा होती तशीच सुरू ठेवावी.

- पृथ्वीराज पाटील, लायसन्सधारक

फोटो...

ऑनलाइनपेक्षा आरटीओ कार्यालयात गेल्यावर काम लवकर होते. ऑनलाइन लायसन्स काढायचा खूप वेळा प्रयत्न केला. मात्र, काहींना काही अडचणी येत असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयातच जावे लागले. अजून लायसन्स काढले नाही, आता ती प्रक्रिया करतो आहे.

-विजय पाटील, लायसन्सधारक

Web Title: Learning license offline only; Crowd again at the RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.