किमान दुसऱ्या लाटेतून तरी आपण धडा घ्यावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:15+5:302021-06-05T04:12:15+5:30
पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. ...
पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. पहिल्या लाटेच्या ९ महिन्यांमध्ये जेवढे रुग्ण आढळले नाहीत, जेवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे मृत्यू व नवीन रुग्ण या तीन महिन्यांत झाले. तरुणांचा बळी गेला... असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, निर्बंध शिथिल होताच, बाजारपेठेत उडालेली गर्दी काय दर्शवतेय... महामारीच्या काळात प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. बाजारात सर्व संपेल, आपल्याला काही मिळणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी आणि त्यातून होणारी ही गर्दी आगामी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही... पहिल्या लाटेनंतर आपण धडा घेतला नाही. किमान दुसऱ्या लाटेतून तरी धडा घेऊ या... आपल्याला साधे तीन नियम पाळायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, त्याशिवाय पर्याय नसेल, तर व्यवस्थित मास्क परिधान करा, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, स्पर्श झाला, तरी ते हात नाका तोंडाला लावू नका, एकमेकांपासून अंतर ठेवून मास्क नाका तोंडावरच परिधान करून बोला... हे नियम कोरोनाला दूर ठेवू शकतात, असे वैद्यकीय यंत्रणा सुरुवातीपासून सांगत आली आहे. दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिलची आकडेवारी, मृतांची संख्या, स्मशानातील चित्र हे सर्वच एकदम भयावह होते, शासकीय यंत्रणेतील बेड मिळविण्यासाठीची वेटिंग, रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची होणारी भटकंती, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रात्र, रात्रभर होणारी धावपळ, व्हेंटिलेटरच्या शोधार्थ रुग्णवाहिकेतच फिरणारे गंभीर रुग्ण... अशी ही भयावह दुसरी लाट ठरली. ३० ते ४० वयोगटांतील अनेक तरुण या लाटेत कोरोनाचे बळी ठरले. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग, प्रमाण अधिकच जलद होते. याचे उदाहरण म्हणजे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत होते. अशी परिस्थिती असताना, आकडे कमी झाले, म्हणून पुन्हा कोरेाना गेल्याच्या गैरसमजातून होणाऱ्या घडामोडी या किती घातक ठरतील, हे वेगळे सांगायची गरज नाही... तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले आहेच... आताच्या स्थितीत गर्दी जेवढी टाळता येईल, तेवढी टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर लाट आपण रोखू शकतो, हे आपल्या हातात आहे... नंतर यंत्रणेच्या भरवशावर राहून आयुष्याशी खेळ करण्यापेक्षा आताच दक्ष राहिल्यास, स्वत:वरील संकट दूर करू शकू, आपोआप कुटुंबावरील, समाजावरील संकट दूर होईल...