भगवान शंकराला आपल्या कातड्याचे जोडे करून देणारा चर्मकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:10 PM2019-09-24T16:10:46+5:302019-09-24T16:11:02+5:30
‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘बारा बलुतेदार’ या सदरात लिहिताहेत अॅड.माधव भोकरीकर...
एखादेवेळी वडिलांनी मला म्हणावे, ‘चलतो का, चल! आपण गांधी चौकात जाऊ.’ नाही म्हणण्याचे कारण नसायचे. मग आम्ही निघायचो. त्यांचा पहिला टप्पा बऱ्याचवेळा असायचा, तो ‘लोहार स्टोअर्स’मध्ये! त्याचे मालक, चंपालालशेठ लोहार, त्यांचे शालेय मित्र. त्यांच्या दुकानावर ‘लोहार स्टोअर्स’ नावाची पाटी बघितली, तर दिसणार नाही, ती दिसायची ‘विश्वकर्मा जनरल स्टोअर्स’ नावाने. हे नाव सांगून जर कोणाला काही आणायला पाठविले, तर तो हमखास घोटाळ्यात पडणार! तेथून आटोपले, गप्पा झाल्या की, निघून एखादेवेळी ‘कन्हैयाशेठ’ यांच्याकडे!
मात्र वर्ष-दोन वर्षांनी, वेळ यायची, ती आर. जी. लोहार यांच्या दुकानाशेजारी असलेल्या घरवजा छोट्या दुकानात जाण्याची. तिथं एक लाकडी बाक, त्याच्या पाठीशी चारपाच दोºया आडव्या बांधलेल्या, त्यावर चपलांचे जोड, त्या दोºया कवेत घेऊन आडवे पडलेले. समोर लोखंडी छोटे घमेले, त्यात पाणी, वेगवेगळ्या तीन दिशेला, बैठक असलेली एक छोटी ऐरण, शेजारीसारख्या वापराने चकाकी असलेला, तळाशी जाड असलेला लोखंडी बत्ता! आसपास दोन-चार पत्र्याचे डबे, शेजारीच काळपट-पांढºया दोºयाचे बंडल, त्याजवळच डिंकासारखा लिंबाच्या आकाराएवढा गोळा! दुकानाच्या किंवा घराच्या कोपºयात चामड्याचे काळपट पिवळ्या मातकट रंगाचे बंडल बांधून ठेवलेले! पाच-सात बिना पॉलिशचे जोडे, हे बाहेरून टाके घातलेल्या आणि त्याच्या तोंडात लाकडी ठोकळे घातलेल्या स्थितीत असायचे. स्वागत करायला दुकानाचे मालक असायचे. अंगात बाह्या नसलेली सैनाच्या कापडाची बंडी, तसलेच धोतर, त्यावर जाडजूड करगोटा बांधलेला! काळसर वर्णाचे, कपाळावर बºयाच वेळा सकाळी लावलेल्या काळ्या बुक्क्याची खुण, गळ्यात तुळशीची माळ, गोलाकार चेहºयाचे, तोंडात दोन-चार दात असलेच तर असले! अगत्य मात्र लक्षात रहाण्यासारखे.
‘अण्णा बहोत दिन बाद आये?’ दुकानाचे मालक! ‘बैठ बेटा’ माझ्याकडे पाहात ‘छोकरा ना?’ हे वडिलांकडे पाहात. ते होकारार्थी उत्तर देत.
वडील बाकावर बसले, की ‘अण्णा, तुम्हारे जुते की हालत क्या हो गयी है? नया बनवावो,’ असे म्हणत, तोवर वडिलांनी त्यांच्या पायातील बूट काढलेले असत. कारण ते त्याच्यासाठीच आलेले असत. त्या दुकानाचे मालक, मग वडिलांच्या पायाचे माप घेण्यासाठी पुठ्ठा-पेन्सिल घेऊन पुढे सरकत. पाय पुट्ठ्यावर ठेवला, की जवळील पेन्सिलीने पायाभोवती फिरवत पायाचे माप घेतले जाई. पायाचे पण माप घेतात, याची मला गंमत वाटे. माप फक्त शिंप्यानेच आणि कपड्याचे घ्यायचे असते हे मला माहीत. इथंतर पायाचे माप घेताय! पायाचे माप घेतल्यावर, गप्पा व्हायच्या. त्यात रेडिमेड जोड्यांमुळे मंदावत असलेल्या, धंद्याची खंत असायची, तर ‘आपली परमेश्वराला काळजी’ हा आधार पण असायचा.
हे वर्णन आमच्या गावातील चर्मकाराचे. थोड्याफार फरकाने सर्वच ठिकाणच्या चर्मकाराचे! चमार हा शब्द ‘चर्मकार’ शब्दापासून आला. हे चमार, अहिरवार, मोची या नावाने ओळखले जातात. भांबी म्हणजे चर्मकार, हे महाराष्ट्रात, पंजाबात आहेत. ही हिंदू समाजातील जरी जात असली, तरी मुघल काळातील धर्मपरिवर्तनामुळे मुस्लीम समाजात पण ‘चर्मकार’ आहेत. वेदकालीन आणि बौद्ध काळापूर्वी पूर्वी चामडे कमावण्याचा धंदा कमी दर्जाचा समजला जात नव्हता. चर्मकारांच्या बायका गावच्या सुइणी असतात. अशा चर्मकारास मेहेर म्हणतात. कनपजिया एकाच तुकड्याचा जोडा करतात, अहिरवार पुढचा भाग कापतात. जोड्यावर कलावस्तूंचे काम करण्यात अहिरवार मुलगी जोपर्यंत कौशल्य दाखवत नाही तोपर्यंत तिचे लग्न होत नाही. गावातील चर्मकाराचा, मेलेल्या गुरांचे कातडे फुकट मिळावे असा हक्क होता. मात्र काळाच्या ओघात पैशाला महत्त्व आले, गुरे विकू लागले आणि यांना दैन्यावस्था येऊ लागली. चर्मकार आपल्याला भगवान शिवाचे पुत्र ‘अरल्या’चे वंशज समजतात. ज्याने भगवान शिवाचे हिमालयातील थंडीपासून रक्षण व्हावे, म्हणून आपल्या कातड्याचे जोडे त्यांना करून दिले होते.
आमच्या पायाला सूर्यनारायणाच्या कडक उन्हाचे चटके, थंडीत आपले हात-पाय आखडू नये म्हणून त्याचे संरक्षण करणाºया वस्तू बनविणारा या पृथ्वीतलावरचा कारागीर, जमिनीवरील विंचूकाट्यापासून आपल्याला वाचविणारे जोडे बनविणारा कलाकार! यांचा व्यवसाय म्हणजे, जनावराच्या चामड्यापासून चामड्याच्या वस्तू, म्हणजे बूट, चपला, पर्स, कातडी पट्टे, चाबूक बनविणे, त्याची दुरुस्ती करणे! मात्र त्यासोबत शेती पण त्याच्या उपजीविकेचा व्यवसाय आहे. आमच्या समाजपुरुषाच्या बारा बलुतेदारांपैकी महत्त्वाचा बलुतेदार! तरी दुर्दैवाने याला आमच्यापैकी काही जणांनी दूर ठेवण्याचा चुकीचा, प्रत्यक्ष परमेश्वराला मान्य नसणारा प्रयत्न केला.
या समाजाने, समाजाच्या रक्षणाची जबाबदारी कधी टाळली नाही, दुसºया महायुद्धाच्यावेळी तत्कालीन ब्रिटिशांकडून यांची विशेष रेजिमेंट होती. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत यांनी, विविध क्षेत्रात, भारतातच नाही तर विदेशातदेखील, आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे.
शिक्षणात, व्यापारात, राजकारणात, समाजकारणात ही मंडळी पुढे आलेली दिसतात, आपल्या भारतीय समाजाचे आणि संस्कृतीचे नेतृत्व करताना दिसतात. आपल्या संस्कृतीचा अत्यंत अभिमान असलेली ही मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य यांची पुरस्कर्ती आहेत. (पूर्वार्ध)
-अॅड.माधव भोकरीकर, रावेर, जि.जळगाव