आम्हाला सोडा, नाही तर तुम्हाला महाग पडेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:29+5:302021-02-23T04:24:29+5:30
जळगाव : घरफोडी करताना चाहूल लागताच घरमालक जागे झाले, त्यांना पाहून चोरट्यांनी पलायन केले, परंतु, त्यांचा हा प्रयत्न असफल ...
जळगाव : घरफोडी करताना चाहूल लागताच घरमालक जागे झाले, त्यांना पाहून चोरट्यांनी पलायन केले, परंतु, त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. बापलेकाने दोघांना पकडले असता त्यांनी ‘आम्हाला सोडा, नाही तर तुम्हाला महाग पडेल, जैनाबादमधील मुले घेऊन येऊ, अशी धमकीच चोरट्यांनी दिली. सोमवारी पहाटे अडीच वाजता शिवाजी नगरातील हुडको भागात हा थरार सुरू होता. किरण अनिल बाविस्कर व सिध्दार्थ राजू तायडे (दोन्ही रा. गेंदालाल मिल) असे पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चॉंदखान पठाण (वय ५२) यांचे दुमजली घर असून ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २१ रोजी रात्री ११.३० वाजेच्या जेवणानंतर सर्व कुटुंबीय दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. तर मुलगा नदीम हा गच्चीवर गेला. पहाटे अडीच वाजता चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. नदीम याला त्यांचा आवाज आला. त्याने याबाबत वडील मेहमूद खान यांना कळविले. यानंतर दोघे बापलेक खाली उतरत असतांना त्यांना जिन्यात दोन जण बसलेले दिसले. लाईट सुरू करताच इतर दोन जण पळाले. त्यांच्यासोबत पाठोपाठ घरात घुसलेले दोन जण पळतांना दिसले. दोघांनी चोरट्यांचा १०० मीटर पर्यंत पाठलाग केला असता पळतांना दोघे चोरटे खाली पडले. त्याचवेळी बापलेकांनी दोघांना पकडले. यावेळी चोरटे व खान यांच्यात झटापटही झाली. आम्हाला सोडा, नाही तर सकाळी जैनाबादचे मुले घेऊन येऊ. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिली. दोघांना पकडून ठेवत खान यांनी शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, खान यांनी घरात पाहणी केली असता, कुलूप व कोयंडा चोरट्यांनी तोडलेला होता. घरातील कुठलाही ऐवज चोरीस गेले नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी मेहमूद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहेत.
जामिनावर सुटताच चोरीचा प्रयत्न
दोघं संशयित शहर पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. शहर पोलीस ठाण्यात चोरीच्याच एका गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी किरण अनिल बाविस्कर यास अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो नुकताच जामिनावर बाहेर आला. त्यानंतर सोमवारी पहाटे शिवाजीनगरातील हुडकोत त्याच्या इतर साथीदारांबरोबरच घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान उर्वरित दोघांचाही शहर पोलिसांकडून शोध सुरू आहे.