जळगावात शासकीय नाट्यगृह सोडून हौशी नाट्य स्पर्धा खाजगी सभागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:05 PM2018-11-01T13:05:25+5:302018-11-01T13:05:48+5:30
सरकारी कार्यालयातील समन्वयाअभावी कलावंत नाट्यगृहापासून दूरच
जळगाव : शहरात शासकीय नाट्यगृह उभारले असताना त्याला बगल देत शहरात होणारी ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी खाजगी संस्थेच्या सभागृहात होत असल्याने नाट्यकर्मींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांस्कृतिक संचालनालय या दोन सरकारी कार्यालयांमधील समन्वयाअभावी स्थानिक कलावंत नाट्यगृहापासून दूर तर राहतच आहे, सोबतच शासनाचा निधी शासकीय कार्यालयाकडे न जाता खाजगी संस्थेला जात असल्याचा सूर देखील उमटत आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस शहरात सुरुवात होत आहे. ही स्पर्धा नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले नाट्यगृहात घेण्यात यावी, यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने मागणी करण्यात येऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र बालनाट्य व इतर स्पर्धा तसेच तालीमसाठीदेखील हे नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
परंतु जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या स्पर्धेसाठी अनामत रक्कमेचा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे संचालनालयाने गंधे सभागृह आरक्षित केल्याची माहिती मिळाली. शासकीय निधीसाठी शासकीय कार्यालय थांबू शकत नव्हते का असा सवाल उपस्थित करून यास केवळ आडमुठेपणा कारणीभूत असल्याचा आरोपही केला जात आहे.
आरक्षणाबाबत कळवूनही जागेत बदल
या स्पर्धेसाठी नाट्यगृह आरक्षित ठेवावे, असे पत्रदेखील संचालनालयाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी माशी शिंकली व स्पर्धा अखेर खाजगी संस्थेच्या नाट्यगृहात घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिकांना संधी कधी मिळणार
शहरात एवढे मोठे नाट्यगृह उभारले असताना केवळ समन्वयाअभावी स्थानिक कलावंत नाट्यगृहात कला सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचा सूर स्थानिक कलावंतांमधून उमटत आहे.
------
शासनाच्याचवतीने घेण्यात येणाºया नाट्यस्पर्धा इतरत्र होत असल्याने स्थानिकांना नाट्यगृहात संधी मिळत नाही. इतकेच नव्हे तर नाट्यगृहाचेही उत्पन्न यामुळे बुडत आहे.
- अरविंद देशपांडे, सदस्य, सुकाणू समिती, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद.