भाजीपाल्याचे स्टॉल सोडून जेव्हा विक्रेते पळतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:46 PM2020-03-25T20:46:28+5:302020-03-25T20:46:40+5:30
पोलिस आल्याच्या अफवेने पळापळ : काहीजण जखमी, झेंडे चौकात थाटली होती दुकाने
शिरसोली : शिरसोली येथे बाजार बंद असल्याने गल्लीत भरलेल्या बाजारात पोलीस आल्याची अफवा पसरल्याने ग्राहक व विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी दुकाने सोडुन पळापळ झाल्याने यात अनेक जण किरकोळ जखमी झाले. अफवा असल्याचे समजताच बाजार पुन्हा सुरु झाला.
शिरसोली प्र. बो. येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. परंतु कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन आजार पसरु नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शिरसोलीत बुधवारचा भरणारा दुसरा बाजार बंद ठेवण्यात आला होता.बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाल्याची दुकाने शिरसोलीतील झेंडे चौकात थाटली होती. बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची चांगली गर्दी झाली असताना कुणी तरी पोलीस आल्याची अफवा पसरवली आणि काही सेकंदात भाजीपाल्याची दुकाने सोडुन हातात मिळेल, ते साहित्य घेवून जागा मिळेल तिकडे पळत सुटले.
यावेळी झालेल्यस चेंगराचेंगरीत कुणी खाली पडले तर कुणाला किरकोळ मार लागून जखमी झाले. नंतर काही वेळाने अफवा असल्याचे समजताच बाजार पुन्हा ‘जैसे थे’ सुरु झाला.