एसएनडीतीत 'कोरोना लस : समज गैरसमज' वर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:39+5:302021-05-16T04:15:39+5:30
जळगाव : अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात 'जागर कोरोना लसीचा' या उपक्रमाअंतर्गत ...
जळगाव : अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात 'जागर कोरोना लसीचा' या उपक्रमाअंतर्गत 'कोरोना लस : समज गैरसमज' या विषयावर शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. विवेक भालेराव यांच्या विशेष व्याख्यान पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे होत्या. व्याख्यानात प्रा. भालेराव यांनी कोरोना लस कशा पद्धतीने तयार केली गेली इथपासून कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन ते स्पुटनिक या लसी संदर्भात माहिती देत या तिन्ही लसींची उपयुक्तता आणि यशस्वीता फार चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या लसींचे डोस घेतल्यामुळे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात 'अँटीबॉडीज' तयार होऊन आपला कोरोनापासून बचाव कसा होऊ शकतो याचे त्यांनी आकडेवारीच्या उदाहरणासह स्पष्ट केले. त्याचबरोबर लसीचे विशेष वैशिष्टे नोंदवताना ते म्हणाले लस घेतल्यामुळे संसर्ग बऱ्यापैकी कमी होताे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमणाच्या धोक्याचे प्रमाण फार कमी राहते. लसीचे कसलेही दुष्परिणाम नसून नकळत ताप, मळमळ अथवा अंगदुखी असे होणे म्हणजे शरीराने लसीला दिलेला प्रतिसाद असतो असे सांगून शेवटी त्यांनी सर्वांनी लस घेण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी व अनेक नागरिकही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. सोमनाथ लोकरे यांनी मानले.