‘काश्मिरी तरुण काल, आज आणि उद्या’ विषयावरील व्याख्यानाने श्रोते थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:11 PM2019-05-04T12:11:27+5:302019-05-04T12:14:20+5:30
रोटरी क्लबतर्फे आयोजित व्याख्यानास प्रतिसाद
जळगाव : गणपती नगरमधील रोटरी हॉल येथे ‘काश्मिरी तरुण काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानातील प्रसंगांनी उपस्थित थक्क झाले.
या प्रसंगी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, सचिव पुष्पकुमार मुंदडा, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील उपस्थित होते. डॉ.राहुल मयूर यांनी परिचय करून दिला.
काश्मिरी तरुण भरकटलेल्या स्थितीत
डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन करताना विविध अनुभव सांगत काश्मिरी तरुण हा भरकटलेल्या स्थितीत असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, काश्मिरातील तरुणांकडे असलेले ज्ञान, कला यांना वाव मिळायला हवा. त्यांचे ज्ञान हे चुकीच्या विचारसरणी असलेल्या व्यक्तींकडून हाताळले जात आहे असेही त्यांनी सांगितले.
मनापासून दगडफेक करीत नाही
सर्वच तरुण मनापासून दगडफेक करीत नसून तिथल्या परिस्थिती नुसार त्यांना या कामी नको असतानादेखील ओढले जात आहे, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ.पाटील यांनी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने अनंतनाग, कुपवाडा, बिरवाह, श्रीनगर तसेच जम्मू येथील मुलींसाठी असलेल्या अनाथालयांची व संस्थेच्या काश्मीर खोऱ्यात असलेल्या एकूण अकरा रुग्णवाहिकांविषयी माहिती दिली.
सदरील व्याख्यानास सर्व रोटरीचे सदस्य उपस्थित होते. रवींद्र वाणी यांनी आभार मानले.
खोट्या संदेशांवर वर विश्वास ठेवू नका
सोशल मीडियावरील काश्मीर बाबत खोट्या संदेशांवर वर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. भारतीय सैन्यदलात काश्मिरी युवक मोठ्या प्रमाणावर असून सैन्यात भरती होण्यासाठी सतत तयार असतात. बरेचसे युवक हे भारतीय प्रशासकीय सेवा उत्तीर्ण होत आहेत तसेच बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या मदतीने महाराष्ट्रात काश्मिरी तरुणी वैद्यकीय, कायदा, संगणक अशा विविध शाखेचा अभ्यास करीत आहेत. काश्मीरमध्ये असलेले अशांततेचे वातावरण प्रेमाने, सामान्य काश्मिरी जनतेसाठी मदतीचा हात पुढे करून कमी होऊ शकते असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.