एलईडी लावूनही ‘दिव्या खाली अंधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:21 PM2019-05-04T12:21:49+5:302019-05-04T12:22:21+5:30

अनेक ठिकाणी अधून-मधून बंद असतात दिवे

LED 'Divya Below Darkness' | एलईडी लावूनही ‘दिव्या खाली अंधार’

एलईडी लावूनही ‘दिव्या खाली अंधार’

googlenewsNext

जळगाव : शहरात ईईएसएलच्या माध्यमातून १५ हजार एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ७ हजार एलईडी शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, ज्या भागामध्ये एलईडी बसविण्यात आले आहेत, अशा भागात ठराविक एलईडी सुरु आहेत तर अनेक ठिकाणी एका एलईडीचे अंतर जास्त असल्याने एलईडीचा प्रकाश पोहचत नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.
शहरात अनेक भागांमध्ये एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. मात्र, काही दिवसांमध्येच नागरिकांकडून एलईडीबाबत तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शहरातील काही भागांमध्ये पाहणी केली असता, अनेक भागांमध्ये लावण्यात आलेले एलईडी हे शो पुरतेच ठरत असून, प्रकाश देखील जास्त मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले.
मू. जे.महाविद्यालय भागात १४ एलईडी बंद
प्रभात चौक, मू.जे.महाविद्यालय ते गिरणा टाकी परिसरात १४ एलईडी बंद असल्याचे आढळून आले. काही एलईडी कधी बंद तर कधी सुरु असल्याच्या या भागात तक्रारी आहेत. यासह अजिंठा चौफुली परिसरात एलईडी सुरु होते. कहर म्हणजे काही एलईडी हे दिवसा देखील सुरु असल्याचे सर्वेक्षणात आढळले.
पिंप्राळा, गणेश कॉलनी परिसर
पिंप्राळा भागात आठवडाभरापूर्वी एलईडी लावण्यात आले. मात्र, आठ दिवसातच या भागातील निम्मे एलईडी बंद झाल्याचे आढळून आले. पिंप्राळा भागातील महामार्गावरील पुलाच्या बाजुलाच दोन मोठे एलईडी लावण्यात आले होते. मात्र, हे एलईडी देखील बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्यावर देखील निम्मे एलईडी सुरु तर निम्मे एलईडी बंद असल्याचे आढळून आले.
नगरसेवकाला माहिती देण्यास विद्यूत विभाग प्रमुखांचा नकार
शहरात एलईडी बसविण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत पिंप्राळा भागातील भाजपाचे नगरसेवक मयूर कापसे यांनी मनपा विद्यूत विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांना विचारणा केली असता, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे उत्तर दिल्याची माहिती नगरसेवक कापसे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
स्टेशन रोड परिसरात पथदिवे बंद
अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या नेहरु चौकापासून ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे बंद दिसून आले. तसेच टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदकडे जाणाºया रस्त्यावरही काही ठिकाणी पथदिवे बंद होते. पद्मालय विश्रामगृहासमोरच चौकामध्ये महावितरणचा विद्युत खांब असून या त्यावर दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत. यातील एक दिवा अधून-मधून कधी तरी सुरु असतो. तर याच ठिकाणी नेहरु चौकाकडे जाणाºया रस्त्यावरील पोलवर दोन दिव्यांपैकी एकच दिवा सुुरु असलेला दिसून आला.
यामुळे रात्रीच्या वेळेला या चौकातच अंधार राहत असल्यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या वर्दळीच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी आहे.
चाचणी न करताच लावले जाताहेत एलईडी
ईईएसएलच्या माध्यामातून शहरात हे एलईडी बसविले जात असून कंपनीतून आलेले एलईडी बसविले जात आहेत. कंपनीकडून कोणतीही चाचणी न करताच हे एलईडी बसविले जात असल्याची धक्कादायक माहिती मनपा विद्यूत विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांनी दिली.
अनेक भागात बसविले कमी दाबाचे दिवे
शहरातील मुख्य बाजारपेठ भागासह इतर भागांमध्ये ७० होल्ट क्षमतेच्या दिव्यांची गरज असून मनपा प्रशासनाकडून केवळ २४ होल्टचे दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एलईडी बसविल्यावर देखील पुरेसा उजेड मिळत नसल्याची तक्रार नागरिकांसह अनेक नगरसेवकांकडून होत आहे. शहरात एकूण २८ हजार खांब असून त्यापैकी ४० टक्के खांब हे निकामी आहेत. त्या खांबांवर हे दिवे लावले जात नसल्याने दोन एलईडीमधील अंतर हे वाढत जात आहे. यामुळे ते लावूनही पुरेसा उजेड पसरत नसल्याचे आढळून आले.
स्वातंत्र्य चौक ते नेहरु चौकपर्यंत अंधारच अंधार
स्वातंत्र्य चौक ते नेहरू चौकपर्यंत लावण्यात आलेल्या ४४ एलईडीपैकी जेमतेम १४ ते १५ एलईडी सुरु असल्याचे आढळून आले. बसस्थानक ते क्रीडा संकूलपर्यंतच्या रस्त्यावर तर एकही एलईडी सुुरु नसल्याने अंधार पहायला मिळाला. नेहरु चौक ते टॉवर चौक पर्यंतदेखील चार ते पाच एलईडी बंद होते. रेल्वे स्टेशनकडील रस्त्यालगतदेखील हिच स्थिती पहायला मिळाली.
काही भागांमध्ये कमी होल्टचे एलईडी दिवे लावण्यात आलेले होते. त्यात देखील काही बरेच खराब निघाल्यामुळे ते कंपनीला बदलविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत नगरपालिका संचालकांकडेदेखील विषय मांडण्यात आला आहे. लवकरच खराब एलईडी बदलविण्यात येतील.
- एस.एस.पाटील, मनपा विद्यूत विभाग प्रमुख

Web Title: LED 'Divya Below Darkness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव