घोसला येथील गुराख्यावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 08:04 PM2018-08-24T20:04:17+5:302018-08-24T20:05:58+5:30
रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव : रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
घोसला येथील रहिवासी असलेले सांडू तडवी गुरे चारण्याचे काम करतात. शुक्रवारी नेहमी प्रमाणे ते रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. त्या वेळी गुरे चरत असताना ते एका ठिकाणी बसलेले होते. त्या वेळी दाट झाडीतून बिबट्या आला व त्याने थेट पंजाने तडवी यांच्या कपाळावर हल्ला केला. त्या वेळी तडवी यांनी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. काही वेळात पुन्हा हा बिबट्या पलटून आला व त्याने तडवी यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी बिबट्यापासून डाव्या हाताने चेहरा वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र बिबट्याने तडवी यांच्या हातावरही पंजाने वार केला. त्यात तडवी यांच्या कपाळासह हातालाही दुखापत झाली. बिबट्या अत्यंत चवताळेला असल्याने तो सोडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:जवळ असलेला कोयता काढला व बिबट्याच्या दिशेने तो चालविला. त्या वेळी बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली.