पिंपळवाड परिसरात बिबट्या परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:31 PM2019-03-30T23:31:31+5:302019-03-30T23:31:51+5:30
परिसर बिबट्याच्या दहशतीखाली
चाळीसगाव : पिंपळवाड म्हाळसा येथील विजय देशमुख यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला असून, बिबट्या परतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वनविभागाने देशमुख यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे.
वरखेडे, मेहुणबारे, पिलखोड, सायगाव, उंबरखेडे, मांदुर्णे, पिंपळवाड म्हाळसा या परिसरात गेल्या दोन वर्षापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांचे शेतातील पशुधनच नव्हे तर वरखेडे परिसरात बिबट्याने सात मानवी बळीही घेतले होते.
देशमुख यांच्या शेतात सहा महिन्यांपूर्वी जेरबंद झालेला बिबट्या नरभक्षक झालेला नव्हता. मात्र त्याने मोठ्या प्रमाणावर पशुधनाचा फडशा पाडला होता. त्याला शंभर कि.मी. अंतरावर सोडण्यात आले होते. मात्र बिबट्या नुकताच ट्रॅप कॅमेºयात कैद झाला आहे.