भार्डू येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:39 PM2020-12-14T16:39:43+5:302020-12-14T16:40:49+5:30
चोपडा तालुक्यातील भार्डू येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : भार्डू तालुका चोपडा येथील वनविभागाच्या जंगलात भार्डू आणि लहान हातेड परिसरातील नागरिकांना बिबट्या निदर्शनास आला. त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला मध्यरात्री यश आले.
बिबट्याने काहीतरी खाल्ल्याने आजारी असल्याने एकाच जागेवर बसल्याचे सगळ्यांच्या निदर्शनास आले. मात्र भार्डू आणि (लहान) हातेड खु. येथील नागरिकांनी बिबट्यास घेरून ठेवले. त्यानंतर वनविभागाचे पथक दिनांक १३ रोजी दुपारी २ वाजता घटनास्थळी पोहोचले. वन विभागानेही या बिबट्यास नागपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात पाठवून जेरबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घटनास्थळी लासूर सत्रासेन येथील वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि दिनांक १३च्या मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागास यश आले.
बिबट्या जेरबंद केल्यानंतर मात्र परिसरातील ग्रामस्थांनी श्वास मोकळा सोडला, अन्यथा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या मध्यरात्रीपर्यंत जेरबंद झालेला नव्हता, तोपर्यंत या दोन्ही गावांमधील नागरिकांची झोप उडालेली होती. एकदाची बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती झाली आणि नंतर मात्र या परिसरातील नागरिकांनी सुखाची झोप घेतली.
बिबट्यास जेरबंद करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी व्ही. एच. पवार, चोपडा वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे, सत्रासेन आणि लासूर येथील वनकर्मचाऱ्यांचा ताफा व भार्डू आणि हातेड खुर्द या गावांमधील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून बिबट्या जेरबंद करण्याचे मिशन फत्ते केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जेरबंद केलेल्या बिबट्यास कोणत्या आणि कुठे सोडावे हा निर्णय घेतला जाईल, असे वनसंरक्षक अधिकारी व्ही. एच. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.