विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:29 PM2021-03-24T23:29:39+5:302021-03-24T23:31:42+5:30
ताडे येथे विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडलेले दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणे, ता. एरंडोल : ताडे येथे विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडलेले दिसून आले. या पिल्लाला मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकवून बाहेर काढण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर हे पिल्लू बाहेर काढण्यात आले.
भातखेडे, ताडे, बाम्हणे या परिसरात आजतागायत अनेक लोकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे परंतु सुदैवाने आतापर्यंत मनुष्यावर व पाळीव प्राण्यांवर अद्याप हल्ला झालेले नाही मोजून एकदोन पाळीव प्राण्यांवर हल्ला झालेला आहे त्यामुळे परिसरात शेतकरी वर्गांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी मजूर वर्ग मिळत नाही अव्वाच्या सव्वा रुपये देऊन सुद्धा मजूर मिळणे फार कठीण झाले आहे कारण अनेक लोकांना रात्री-बेरात्री बिबट्या वाघाचे दर्शन झालेले आहे.
दिनांक २४ रोजी सकाळी बाम्हणे येथील भिल्ल समाजाचा व्यक्ती पाळीव शेळींना चारा घेण्यासाठी ताडे येथील शेतकरी किसन परभत पाटील यांचे बाम्हणे शिवारात शेती आहे. गट नंबर ३६ च्या विहिरीत बिबट्या वाघाचे पिल्लू पडलेले दिसले. त्यांनी याबाबत बाम्हणे आंबे येथील पोलीस पाटील तुकाराम भिल यांना याची खबर दिली. यावेळी पोलीस पाटील तुकाराम भिल यांनी वनविभाग एरंडोल यांच्याशी संपर्क साधला व माहिती दिली. यावेळी सहायक वनरक्षक सुदर्शन शिसव, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वनपाल राजकुमार ठाकरे, वनरक्षक शिवाजी माळी, योगेश देशमुख, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, वन मजूर रामचंद्र मोरे लक्ष्मण मोरे व शरद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन केले.
बिबट्या वाघाच्या पिल्लाला मासे पकडण्याच्या जाळ्याने वर काढले व आणलेल्या पिंजऱ्यात त्या पिल्लाला कोंबण्यात आले. यावेळी बाम्हणे येथील भिल्ल समाजाच्या व्यक्तीने स्वतः विहिरीत उतरून त्या पिल्लाला माशाच्या जाळ्यात अडकवले. हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास दोन तास चालले.
पिल्लाच्या मातेचा शोध घेणार
वनरक्षक शिवाजी माळी यांनी सांगितले की, हे बिबट्याचे पिल्लू हे जवळपास एक ते दीड महिन्याचे आहे. त्यासाठी आम्हाला आज रात्रभर यास शेतात त्या पिल्लाला पिंजऱ्यात घेऊन बसावे लागेल. या पिल्लाच्या शोधात मादी जातीचा बिबट्या म्हणजे त्या पिल्लाची आई. रात्री त्याच्या शोधात येऊ शकते, त्यावेळी या पिल्लाला त्याच्या आईच्याबरोबर आम्ही सोडून देणार.