जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:28 PM2018-12-16T17:28:11+5:302018-12-16T17:31:15+5:30
जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे.
जळगाव : जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके आधीच दुष्काळी जाहीर झालेले असताना उर्वरीत एरंडोल व धरणगाव या दोन तालुक्यातील १५४ पैकी दुष्काळी जाहीर न झालेल्या १०८ गावांची आणेवारीदेखील ५० पैशांपेक्षा कमी जाहीर झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके देखील दुष्काळी जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील हंगामी पैसेवारी ५० च्या आत आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. वगळलेल्या दोन तालुक्यापैकी एरंडोल तालुक्यातील कासोदा व उत्राण आणि धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळातही दुष्काळी परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. आता अंतीम पैसेवारीही ५० च्या आत आल्याने उर्वरीत दोन्ही तालुकेदेखील दुष्काळी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी जळगाव दौऱ्यातच याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली असून ज्या गावांना दुष्काळातून वगळण्यात आले आहे परंतू तेथील परिस्थिती खरोखरच गंभीर आहे, अशा गावांचा प्रस्ताव या समितीसमोर पाठवावा. समिती त्यावर विचार करून निर्णय घेणार आहे. दर सोमवारी ही समिती बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याने सोमवारी प्रस्तावबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना केली होती. त्यातच आता पैसेवारीदेखील ५० च्या आत आल्याने हे दोन्ही तालुके संपूर्ण दुष्काळी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.