कमी मनुष्यबळ, जास्त ताण, यंत्रणा झाली हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:17 AM2021-04-01T04:17:52+5:302021-04-01T04:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात एकाच महिन्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात एकाच महिन्यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना फारशी अडचण होत नसली तरी जे गंभीर रुग्ण आहेत. त्यांना त्यांचे नातेवाईक आशेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसी) आणतात. त्यामुळे बहुतेकवेळा जीएमसीसमोर रुग्णवाहिका उभ्या असतात. जीएमसीत अजून जवळपास ४८ बेड्ससाठी जागा असली तरी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नवे रुग्ण इतर रुग्णालयात हलवावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजारापेक्षा जास्त आहे. रुग्णालयांमध्ये बेड मी पडु लागले आहेत. त्यामुळे याआधी बंद केलेली कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करावी लागली आहे. त्यात गृह विलगीकरणात दाखल केलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहेत. आता जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा मोहाडी रस्त्यावरील नव्या रुग्णालयाकडे वळले आहे. या रुग्णालयात दोनन दिवसात १०० बेडसचे रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत आहेत. त्यातच मंगळवारी पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर बुधवारी या ठिकाणी १०० बेड्स आणि गाद्या, उशी नेण्यात आली. त्यासोबतच तेथे ऑक्सिजन पाईपचे काम देखील सुरू आहे.
जीएमसीमध्येच सध्या किमान २० डॉक्टर्सची आवश्यकता आहे. त्यात औषधशास्त्रात एम.डी. असलेले चार डॉक्टर गरजेचे आहेत. तर सध्या दिवसाला १३०० नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यातही नवे आरएनए एक्स्ट्रॅक्टर किट आणि नवे चाचणीचे मशिन आल्यावर ही क्षमता वाढेल मात्र त्यावेळी मायक्रोबायोलॉजिस्टची गरज जिल्हा प्रशासनाला लागणार आहे. सध्या चाचणी करण्याची सर्वात मोठी सुविधा ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध आहे.
अधिष्ठांतासह प्रशासन करतेय कसरत
शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड उपलब्ध नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासन सध्या दररोज काही रुग्णालयांना कोरोना उपचाराची परवानगी देत असली तरी अनेकांचा कल जीएमसीत दाखल होण्याकडे आहे. त्यामुळे बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सध्या तारेवर कसरत आहेत. या सर्व बाबींचा आढावा सध्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे घेत आहेत.
जीएमसीला आवश्यक मनुष्यबळ
आवश्यक कर्मचारी
डॉक्टर्स २०
एमडी औषधशास्त्र ४
स्टाफ नर्स ३०
बेडसाईड असिस्टंट २०
मायक्रो बायोलॉजिस्ट ५