आठ तालुक्यांमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण, सहा तालुके कोरोनामुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:03+5:302021-01-13T04:38:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांध्ये सध्या दहापेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून यातील सहा तालुक्यांनी कोरोनामुक्तीकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील आठ तालुक्यांध्ये सध्या दहापेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून यातील सहा तालुक्यांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या तालुक्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. असे असले तरी जळगाव शहरात मात्र, कोरोना नियंत्रणात येत नसून रोजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरातीलच अधिक रुग्ण समोर येत आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यातील बाधितांचे प्रमाण हे आठ टक्क्यांवर पोहोचले असून अन्य तालुक्यांच्या तुलनेत जळगाव शहरातील रुग्णवाढीमुळे कोरोनाचा जिल्ह्याचा रुग्णवाढीचा आलेख वाढला आहे. जळगाव शहरात सद्य:स्थितीत २४८ सक्रिय रुग्ण असून जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या ४९ टक्के आहे. काही तालुक्यांमध्ये मात्र कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. यात बोदवड या तालुक्यात कमी सक्रिय रुग्ण आहेत. चोपड्याला अचानक रुग्णवाढ समोर आल्याने सक्रिय रुग्ण वाढले, अन्यथा या तालुक्यातही कोरोना नियंत्रणात होता.
तालुका ॲक्टिव्ह रुग्ण
बोदवड ०१
धरणगाव ०५
यावल ०६
पाचोरा ०७
एरंडोल ०७
भडगाव ०८
जामनेर १०
चाळीसगाव १०
सक्रिय रुग्णांमध्ये घट
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. हे तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असून यात बोदड येथे गेल्या काही दिवसांपासून एकही रुग्ण समोर आलेला नसून या ठिकाणी केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. यासह धरणगावात ५ सक्रिय रुग्ण आहेत.
एकत्रित बाधितांचे प्रमाण : १३ टक्के
सध्या बाधितांचे प्रमाण : ८ टक्के
बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.७५ टक्के
गृह विलगीकरणातील रुग्ण ३२५
आतापर्यंत झालेल्या चाचण्या : ४,०४,२४५