सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नातून कोरोनाला हद्दपार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:57 PM2020-06-19T21:57:20+5:302020-06-19T21:57:30+5:30

जिल्हाधिकारी अभिजित राऊत : मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक

Let’s banish Corona with positive and team effort | सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नातून कोरोनाला हद्दपार करू

सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नातून कोरोनाला हद्दपार करू

Next

जळगाव : कोरोना कक्षात २४ तास आरोग्य सेवा अविरतपणे कार्यरत असणे आवश्यक असून सर्व रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळणे हा त्या रुग्णांचा मुलभूत अधिकार आहे. त्यापासून एकही रुग्ण वंचित राहता कामा नये, असा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. येणाऱ्या अडचणींवर लवकरच योग्य तो मार्ग काढून सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नातून कोरोना विषाणूला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू, असा विश्वासही जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समिती व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणांसह सर्व संबंधितांना वरील सूचना केल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, महानपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी आदी उपस्थित होते.


डॉक्चरांनी दररोज एकमेकांसी संवाद साधावा
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. संशियत आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये आवश्यक ते उपचार सुरु आहेत. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्ण लवकरात लवकर पूर्णपणे बरा होऊन त्याच्या कुटुंबियांमध्ये आपल्याला आनंद निर्माण करता यावा, यास सर्व कोविड सेंटरच्या डॉक्टरांचे प्राधान्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टरांनी दररोज सायंकाळी नियमितपणे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून एकमेकांशी संवाद साधावा. तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, याची माहिती घेऊन पुढील उपचारासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.


अहवाल २४ तासात येण्यासाठी नियोजन करा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासह मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅब तपासणी अहवाल २४ तासात प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. बैठकीस उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी मनुष्यबळ, साधनसामुग्रीबाबत उपस्थित केलेल्या अडचणींवर लवकरच योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे सांगून सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नातून कोरोना विषाणूला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष कोरोना कक्षात जावून आपल्या आप्तजनांची भेट घेणे टाळावे. तसेच आरोग्य प्रशासनाने नातेवाईकांना त्यांच्या कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा निश्चित करून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचा संवाद घडवून आणावा. त्यात कुठेही उणिवा भासता कामा नये तसेच समन्वयाची कमी सुध्दा आढळता कामा नये, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेवटी सर्व यंत्रणांना सांगितले.
उपस्थित अधिकाºयांनी आपापल्या विभागाने आतापर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना आणि केलेल्या कामाचा लेखाजोखा जिल्हाधिकाºयांसमोर सादर केला.

Web Title: Let’s banish Corona with positive and team effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.