बोरांच्या रूपाने असलेली ओळख मेहरुणला पुन्हा मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:27+5:302021-07-05T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत चालली आहे. मेहरुणच्या ‘त्या’ बोरांची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.
रविवारी ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे संपूर्ण शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर साकारल्या जात असलेल्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रकल्पांतर्गत मेहरुण परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. यावेळी माजी आमदार मनीष जैन, जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, विनोद चौधरी, पारस टाटिया, बंटी बुटवानी, आनंद मराठे, प्रकल्पप्रमुख विजयकुमार वाणी, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, सतीश रावेरकर, अनुराधा रावेरकर आदी उपस्थित होते.
काय आहे प्रकल्प
१. मेहरुण तलावाच्या काठावर ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे फळबाग व रानमेवा प्रकल्प साकारला जात आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सीताफळ, रामफळ, जगप्रसिद्ध मेहरुणची बोरे, तसेच महाबळेश्वरची मलबेरी (सैतू), नाशिकचे करवंद व बर्हाणपूरची गोड खिरणी अशा रानमेव्याची लागवड केली जाईल.
२. हा प्रकल्प लोकसहभागातून साकारला जात असून, पाच वर्षे या रोपांची जोपासना ‘मराठी प्रतिष्ठान’ करेल. साधारणपणे दुसर्या वर्षापासून काही झाडांना फळधारणा होईल. त्यांच्या लागवडीसाठी पाचशे खड्डे खोदले जाऊन, त्यात कीटकनाशक, जैविकखत टाकले गेल्यानंतर रोपांची लागवड होईल. या प्रकल्पात वृक्ष दत्तक योजनाही असून, नागरिकांना यात सहभाग नोंदविता येईल, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.