चला जाऊ या आनंदाच्या गावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:13+5:302021-07-04T04:12:13+5:30
प्रगतशील विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या काळात मानवाला एका व्हायरसने वेठीस धरत, हादरवून सोडत कित्येकांचे बळी घेतले. ‘कोरोनाने मानवी ...
प्रगतशील विज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या काळात मानवाला एका व्हायरसने वेठीस धरत, हादरवून सोडत कित्येकांचे बळी घेतले. ‘कोरोनाने मानवी जीवन त्रस्त केले आहे. भीती, दडपण, चिंता, व्याधी आणि मृत्यूचा पाश या शब्दांनीच धडकी भरू लागली. काहींनी ती अनुभवली, अजूनही ही भीती कमी झालेली नाही, परंतु जीवन तर जगायचेच आहे, मात्र ते आनंदी होऊन (राहून) का जगू नये?
मानवाचे जीवन हा एक प्रवासच आहे. या प्रवासात सर्व सोबत राहतात असे नाही. काही सोबती अत्यंत प्रेमाचे, जवळचे निघून जातात. त्यांच्या जाण्याने प्रचंड आघात होतो, तरीही जीवन जगावेच लागते ना! कोरोना काळात ही वस्तुस्थिती अनेकांनी अनुभवली आहे. माणसाला चाकांची गती मिळाली होती. पद, पैसा, प्रतिष्ठा, करिअर आणि वेळ नाही, हेच ऐकायला येत होते. श्रीमंत, गरीब हा प्रकार तर होताच, परंतु कोरोना या विषाणूमुळे माणसाला जीवनाची, जगण्याची किंमत समजली. मानवी जीवन किती अनमोल आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे कोरोना काळातील परिस्थितीने दाखवून दिले. अहंकार माणसाला माणुसकीपासून दूर घेऊन गेला होता. हाच ‘मी’पणा कमी व्हायला सुरुवात झाली. कितीही कोट्यधीश असला तरी पैशाने त्याचे प्राण वाचलेले नाही, हे सत्य सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. म्हणून आता फक्त आपले जीवन ‘आनंदी कसे जगायचे याचाच विचार महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला ज्या दिशेने जायचे आहे, मुळात त्यासाठी आपली दृष्टी सकारात्मक ठेवायची आहे. हे तर स्वत:चे स्वत:लाच करावे लागणार आहे.’
१) दृष्टीची सकारात्मकता (कशी ठेवावी) : तर प्रथम दुसऱ्यांचे दोष पाहणे सोडले की बऱ्याच गोष्टी थांबतात. कोरोना काळात सर्वांना घरातच राहावे लागत आहे. त्यामुळे घरातील जास्त व्यक्ती, कामांची वाटणी, मुलांचा गोंधळ... यासारखे अनेक... भांडणांचे प्रमाण वाढले, मन:शांती ढळली. गैरसमज निर्माण झाले. या सर्वांकडे हे तर होणारच, अशी आपल्या मनाला आपणच समजूत घातली तर आपोआप दृष्टी सकारात्मक होण्यास मदत होते व त्या व्यक्तींच्या चुका आपण समजून घेतो. पर्यायाने वाद टळतो व घरातील वातावरण प्रदूषित होत नाही. आनंद मिळतो.
२) परिवाराला समजून घेऊन माणसं जोडणे : कोरोना काळात विभक्त आणि एकत्र या कुटुंब पद्धतीकडे पाहता एकत्र कुटुंबात सर्वांना आधार मिळाला. शारीरिक, मानसिक, आर्थिक आधाराने कोरोना संकटावर मात करता आली. परिवारातील व्यक्तींची खरी ओळख झाली. आर्थिक ताणही पडला नाही. तोच विचार विभक्त कुटुंबात मदत कोणतीही नाही. परिवाराशी संबंध चांगले नसल्यामुळे एकटेपणा जाणवला. यासाठी तुम्ही कितीही दूर असलात तरी चालेल. मनाने तुम्ही कुटुंबातील माणसांशी जोडलेले राहणे केव्हाही चांगले असते हे समजले. परिवारातील मतभेद दुर्लक्षित करून परिवार टिकला तर आनंदही मिळतो.
३) स्वत:ला आनंदीत ठेवा : आपण स्वत: आनंदी असलो तरच दुसऱ्याला आनंद देऊ शकतो, म्हणून स्वत:पासून आनंदी राहायला हवे. स्वत:चे आत्मावलोकन केले पाहिजे. स्वत:वर लक्ष द्यायला हवे. कसे? तर माझा मूड नसेल तर चिडचिड होते, काम झालेले नसले की आपण घरातील व्यक्तीवर, मुलांवर त्याचा राग काढतो. त्यामुळे घरात अशांतता, अस्वस्थता पसरते. प्रथम स्वत:चा विचार करताना स्वत:ला शांत, संयमी ठेवायला हवे. कोणाकडून काही चुकले तर समजावून सांगायला हवे. आपल्याकडून काही चुकत तर नाही ना, याचा आपणच विचार करून स्वत:ला बदला. दुसऱ्यांना बदलविणे सोपे नाही. त्यामुळे आपला आनंद आपण घालवून बसतो. स्वत:ला काहीतरी छंद लावून आनंदी करायला हवे. जीवन नक्कीच आनंदी होईल़.
४) लहान गोष्टीत मोठा आनंद शोधा : मी, माझे वय, माझी प्रतिष्ठा, पद, मोठेपणा माझी पोझिशन या बदलांमुळे आपण जगण्याचा आनंदच सोडून देतो. फक्त जगतो, परंतु लहान गोष्टीत मोठा आनंद हे तत्त्व लहान मुलांकडे असते. त्यांना लहानगी वस्तू दिली तरी ते आनंदी होतात. आपण मात्र या आनंदापासून वाढत्या वयाबरोबर दूर जात आहोत. गरिबाला झोपडीत राहून आनंद मिळतो. आपल्याला सुखवस्तू असूनही आनंद घेता येत नाही. कारण तृष्णा. भगवान बुद्धांनी तृष्णा हेच दु:खाचे मूळ सांगितले आहे. आपण अतृप्त असल्यामुळे लहान गोष्टीत आनंद घेत नाही. हा आनंद आपल्याला स्वत:ला शोधावा लागणार आहे. तो पैसे देऊन विकत मिळणार नाही हे कळते, परंतु तरीही आपण त्याचा शोध घेत नाही.
५) निसर्ग सान्निध्यात आणि विविध छंदातून आनंद : कोरोना काळात मानसिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन होतो. तेव्हा निसर्गातील आनंद देणाऱ्या घटकांसोबत वेळ घालवायला हवा. वृक्षारोपण, बागेत, कुंडीतील झाडांची देखभाल वगैरे. हे प्रमाण मात्र कोरोना काळात वाढलेले दिसत आहे. विविध छंद, वाचन, नृत्य, खेळ या माध्यमातून स्वत:ला आनंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. वाचनातून अनेकांना आनंदही मिळतो व ज्ञानही मिळते आहे. नृत्यातून शारीरिक, मानसिक फायदा होत आहे.
विविध सेवाभावी संस्थांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. तात्पर्य असे की छंदातून आनंद घेणे हे स्वत:वरच आहे.
६) योग : उपासना, ध्यान, धारणा, विपश्यना या सर्वांच्या माध्यमातून आनंद घेता येतो. कोरोना काळात अनेकांच्या घरात समस्या वाढल्या. चिंतेमुळे प्रकृतीवर परिणाम झाला. आरोग्याच्या तक्रारी आणि घरातील कमवत्या व्यक्तींचा गेलेला आधार, अचानकपणे हातातून गेलेले काम, नोकरी त्यामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक ताणतणाव निर्माण झाला. या तणावापासून वाढते ब्लडप्रेशर, डायबेटीस, मनाची अस्वस्थता यामधून स्थैर्य आणण्यासाठी मन:शांतीसाठी योग, उपासना, प्रार्थना, विपश्यना करणे गरजेचे झाले आहे. यामुळे आपल्याला स्थिरता मिळते व जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. योगाचे घेतले जाणारे ऑनलाइन वर्ग, आध्यात्मिक केंद्रांमार्फत घेतली जाणारी उपासना, विपश्यना या माध्यमातून कोरोना काळातून साधकांना मन:शांती मिळत आहे. ही सकारात्मकता नक्कीच आनंदी जीवनाकडे नेणारी आहे.
कोरोना काळात आनंदी जीवन जगायचे तर आहे, परंतु इतर व्यक्ती तो आनंद देऊ शकणार नाहीत, स्वत:लाच आनंद शोधावा लागणार आहे. मार्ग तर अनेक आहेत. स्वत:लाच चालावे लागणार आहे. त्यासाठी आनंदी होण्याची इच्छा असावी लागणार आहे. चला तर मग कोरोनाशी संघर्ष करूनही आपला आनंद आपणच घेऊ या. आनंदी जीवन जगू या.
- प्रा. डॉ. रजनी लुंगसे, शिरपूर