पुन्हा भरारी घेऊ, आत्मनिर्भर होऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:18+5:302020-12-15T04:32:18+5:30
स्थलांतराचा कटू अनुभव घेतला. तसा मजूर, कामगार परतू लागल्याचा सुखद दिलासादेखील कालांतराने मिळाला. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग पुन्हा गती ...
स्थलांतराचा कटू अनुभव घेतला. तसा मजूर, कामगार परतू लागल्याचा सुखद दिलासादेखील कालांतराने मिळाला. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग पुन्हा गती घेऊ लागले. कोरोनापूर्व वेग नसला तरी चाके हलू लागली, हेदेखील खूप महत्त्वाचे आहे.
कोरोनामुळे आरोग्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. नऊ महिन्यांच्या लॉकडाऊन काळात आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. कुटुंब, आरोग्य ही मोठी संपत्ती आहे. त्याची काळजी, देखभाल घेणे खूप महत्त्वाचे आहे, हा धडा, संदेश या काळाने दिला. प्रत्येक नागरिक सजगपणे, सतर्कपणे या दोन विषयांवर विचार करू लागला. आयुष्यात अनावश्यक, अकारण केल्या जाणाऱ्या बाबी ध्यानात आल्या. त्यावाचून काही अडत नाही, हे लक्षात आले. कौटुंबिक स्नेह, संवाद व संबंध अधिक दृढ झाले. हे केवळ कुटुंबामध्येच झाले असे नाही तर व्यापार, व्यवसाय व उद्योगातदेखील कौटुंबिक भावना दृढ झाली. संकट काळ, अडचणीच्या काळात व्यवस्थापन व कर्मचारी या दोन्ही घटकांनी एकमेकांना समजून घेतले. परस्परांना विश्वास दिला. सारे काही पूर्ववत होईल, अशी ग्वाही या स्नेहबंधातून निर्माण झाली.
आरोग्य क्षेत्राचे महत्त्व साऱ्या जगाला पटले. गावपातळीवर आरोग्य सुविधा निर्माण होण्याची आवश्यकता लक्षात आली. शासन व प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करून आरोग्य सेवा केली. समाजानेदेखील पुढाकार घेत प्रशासनाची मदत केली.