बहिणाबाईस पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 01:21 AM2019-12-09T01:21:41+5:302019-12-09T01:23:26+5:30
प्रिय आई, बहिणाबाई चौधरी. (होय, आईच गं तू माझी. आई मुलाला जन्म देते आणि संस्कार करते. तसाच तुझ्या कवितेच्या प्रेरणेने माझ्या कवितेचा जन्म झाला आणि वास्तवाची जाणीवही झाली म्हणून तूच खरी माझ्या कवितेची आणि माझीही आई झालीस.) ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील मराठी विषयाच्या अध्यापक प्रा.संध्या महाजन...
प्रिय आई ,
सादर प्रणाम.
‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असं तुझं नाव आपल्या लाडक्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठानं अभिमानानं त्याच्या माथ्यावर सुवर्ण अक्षरात कोरलयं बघ. कसं दिमाखात अमर केलंय तुझ्या कवितेला त्यानं, पण तेवढं सामर्थ्यही तुझ्या त्या गोड ग्रामीण लेवागण बोलीतून जीवनाचे सार सांगणाऱ्या कवितेत समावलेलं आहे म्हणूनच हे सारं शक्य झालंय.
लेवागण बोलीची पताका तुझ्या कवितेनं आसमंती फडकवली आणि आपल्या बोलीला संजीवनी देणारी अमृतवाहिनीच बनली गं.
एका निरक्षर महिलेचं नाव विद्येच्या माहेर घराला दिलं गेलं हे ऐकल्यावरच तुझ्या कवितेत असं काय असावं, अशी उत्सुकता जागी होते आणि आपसूकच तुझं पुस्तक हाती घेऊन ते वाचल जातं आणि एकदा का हे पुस्तक हातात पडलं की वाचक त्याच्या अक्षरश: प्रेमात पडतो बघ. अधाशासारख्या एक-एक कविता वाचून झाल्यावरच भानावर येतो.आणि हो नुसत्याच वाचत नाही तर आपोआपच तालासुरात वाचतो एवढं सामर्थ्य आहे या कवितांमध्ये.
इतकी अफाट निरीक्षण शक्ती कुठून आली तुझ्याठायी हे जणू एक कोडंच बनलंय आजकालच्या समीक्षकांसाठी.
अगदी छोटाशा चिमणीच्या खोप्यापासून, बी-बियाण्यापासून नांगरणी, वखरणी, विविध सण उत्सव, माणसांचे नानाढंगी स्वभावधर्म... काही... म्हणता काहीच सुटलं नाही तुझ्या कवितेतून. बी-बियाणं पेरल्यानंतर त्यावरील मातीला
‘वºहे पसरली माटी
जशी शाल पांघरली’
अशी कल्पना फक्त तूच करू जाणे गं बाई...
तुला सांगू तुझ्या त्या-
सोन्यारूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकºयाचा विठोबा
पानाफुला मंधी राजी
या कवितेचा भोळाभाव किती मोठ तत्त्वज्ञान सांगतो मानवाला.
संसाराचे रखरखते चटके खातानासुद्धा कोणतीही तक्रार न करता
‘अरे संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर’
असंच म्हणत तू सहनशीलतेची पराकाष्टा शिकवलीस. प्रत्येक संसारी स्त्रीसाठी जगण्याची नवी प्रेरणाच तू प्रत्येक कवितेतून स्त्री सुलभ मनात पेरत गेलीस.
अगदी कमी वयात वैधव्य येऊनही तू खंबीरपणे लेकरापाठी उभी राहिलीस कपाळीचं कुंकू पुसलं गेलं, अहेवचुडा फुटला तरी तू तुझ्या डोळ्यासमोर दोन लाल उभे राहिलेत
‘राहो दोन लाल सुखी, हेच देवाले मागनं
त्यात आलं रे नशीब, काय सांगे पंचांगन,
नको नको रे जोतिषा नको माह्या हात पाहू
माह्य दैव कये मले नको माह्या दारी येऊ
केवढं तुझं हे आत्मभान’
अगं, स्वत:च्या लेकरावर तर प्रत्येक आई माया करतेच, पण तू म्हणजे मात्र अजबच रसायन.
सासूवर, देराणी-जेठाणीवर नणंदेवरच नव्हे गोठ्यातल्या जनावरावरसुद्धा तू तितकंच प्रेम उधळलंस.
‘त्या भाकड गायीवरची माया तू
माझ्या कपिलेची पाठ
जशी माहेराची वाट
अशी व्यक्त केलीस.’
एवढंच काय देराणीसोबत माहेरी जाताना दगडाची ठेच लागल्यावर तुला त्यातूनही आवाज आला...
‘नीट जाय मायबाई नको करू धडपड
तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड
किती प्रेमानं, ममतेनं भरलेलं हृदय मिळालं होतं तुला.
तुला सांगू मला तुझ्या त्या योगी आणि सासुरवाशीण मधल्या त्या
दे रे योग्या दूरे ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते
या ओळी अगदी हृदयाच्या जवळच्या वाटतात. तू त्या काळातही मुलीच्या जन्माविषयी आस्था दाखवलीस. तू त्या योग्याला सांगतेस,
‘अरे लागले डोहाये
सांगे शेतातली माटी
गानं गाते माहेराच
लेक येईन रे पोटी’
आणि
आई आणि बाबांबद्दल तू म्हटलेल्या दोन दोनच ओळीत केवढं प्रेम आणि आदर दर्शवलास तू.
आई आणि आत्या (सासू)
माय म्हनता म्हनता
होट होटालागी जुळे
आत्या म्हनता म्हनता
केवढ अंतर ते पडे
बाबा आणि काका
ताता म्हनता म्हनता
दातामधी जीभ अडे
काका म्हनता म्हनता
कशी मांघे मांघे दडे
एखाद्या भाषाशास्त्र शिकवणाºया अध्यापकाप्रमाणे सूक्ष्म निरीक्षण केलेस उच्चारण स्थानांचे...
अग, फक्त मायेची माणसंच नव्हे तर अगदी दारी येणारा, भिक्षुकी करणारा बहुरूपीसुध्दा तुझी कविता फुलवतोय. रायरंग म्हणायचे, त्याला गावातील लोक तेव्हा त्याला हिणवतही असतं. पण तू मात्र त्याच्याबद्दल सांगतेस अरे हिणवू नका. त्याला तो थकल्या भागल्याची कष्टकºयाची करमणूकच करतो, भिक्षा नाही मागत, बघा त्याच्याकडे.
‘कोन्ही म्हने आलं दारी
रायरंगाचं रे सोंग
अरे त्याच्या सोंगामधी
माले दिसे पांडुरंग’
त्याच्यातसुद्धा तू पांडुरंग पाहिलास धन्य आहेस गं बाई तू.
तुझ्या गावाचं तू केलेलं वर्णन तर केवळ अप्रतिम... राममंदिरापासून ते बौद्धवाड्यापर्यंतचा तो प्रवास, अगदी तंतोतंत गाव डोळ्यासमोर उभा केलास.
संसाराच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवताना तुझ्या मिश्कील स्वभावाचे दर्शन होते ओली लाकडं ओली आगपेटी यामुळे चूल पेटत नव्हती तर तुझं गाणं झालं सुरू...
‘पेट पेट धुक्कयेला
किती घेशी माझा जीव
अरे इस्तवाच्या धन्या
कसं तुले आल हीव...’
अगं कुठून आणत होतीस एवढा शब्दभरणा... स्वत: अशिक्षित असून तुझं पुस्तक आज कित्येक लोकांना शिक्षित करतंय. कितीतरी प्राध्यापक पीएच. डी. झालेत तुज्या एवढ्याशा कवितांवर. भाषा अध्ययन केंद्रावर संशोधन होतंय तुझ्या कवितेवर.
‘मस्तकात पुस्तकात गेलं
पुस्तकातलं मस्तकात आलं’
म्हणत तू काव्यगायन करत होतीस. तेही कोणत्याही पुस्तकातलं न वाचता न लिहिता.
तुझ्या कवितेने कितीतरी ‘कोरे कागद शहाणे’ केले गं...
‘मानवाच्या अति चंचल मनाला तू
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला फिरी येई पिकावर’
अशी ढोराची उपमा दिलीस...
आणखी महत्त्वाचं सांगू तुझ्या याच लेवागण बोलातील कवितांनी समाजभाषेला नवसंजीवनी तर दिलीच पण भाषा समृद्धीचेही वरदान देऊन उपकृत केलं आहे .अनंत उपकार तुझ्या एकमेवद्वितीय काव्यसंग्रहाने समाजभाषेवर केले आहेत.
किती लिहू ग माऊली तुझ्या कवितेवर कधी संपणारच नाही.
एक विनंती आहे माझी...
तुझ्या त्या सरोसती आईला ज्या आईने तुझ्या मनात इतकी गुपितं पेरलीत तिला माझ्या कवितेवरही थोडी कृपादृष्टी ठेवायला सांग ना...
‘तुझ्या कवितेचे बाळकडू पिऊन माझीही कविता समृद्ध होऊ दे.
एवढा आशीष तुझा असू दे माझ्या कवितेवर.’
तुझ्या कृपेची अभिलाषी
तुझी एक लेक...
प्रा.संध्या महाजन, जळगाव