शांतीपर्वातील मौनाची अक्षरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:33+5:302020-12-12T04:32:33+5:30
प्राचार्य डॉ. किसन पाटील कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन ...
प्राचार्य डॉ. किसन पाटील
कोरोना महामारीचा हा लाॅकडाऊनचा कडीबंद काळ साऱ्या विश्वाला संकट काळ ठरला. जगण्याचे निर्बंध साहित्य, लेखन आणि कला क्षेत्रावरही उमटले. यामध्ये छपाई, प्रकाशन व्यवसाय, पुस्तक विक्रीत मंदी आली. ग्रंथालय बंद यामुळे वाचनात खंड पडला, मात्र या काळात लेखक, कवी, कलावंतांना एकांतवासात निर्मितीला संधी मिळाली. प्रत्यक्षातले परिसंवाद, साहित्य संमेलने, चर्चासत्रे यावर निर्बंध आली; परंतु ऑनलाइनची संधी यामुळेच घेता आली.
महामारीच्या अडचणी उभ्या राहिल्या; परंतु सोशल मीडियावरून विचार, विकार प्रगती करण्याची भरमार अव्याहतपणे सुरू होती. या चर्चेत बऱ्याचदा वास्तव आणि ज्ञानात्मकतेपेक्षा एकांगी विचार, अंध भक्तियुक्त पूर्वग्रह दूषित भावनांचे पडसाद उमटले. गटबाजी आणि आग्रही मतांची धुळवड उडत राहिली.
साहित्य निर्मितीला या विजनवासातील ‘शांतीपर्व’ अनुभवता आले. संत ज्ञानेश्वरांच्या ‘मौनाची अक्षरे’ या आध्यात्मिक सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. विशेषतः गद्यापेक्षा पद्य-काव्यलेखनाच्या निर्मितीतील संधीच सापडली. काव्य मैफिली रंगल्या, विविध लिंकवरील परिसंवाद, भाषणे आणि विचारप्रबोधन - परिवर्तनामुळे वातावरण उत्साहित झाले. दिवाळी अंकाच्या निर्मितीवर काहीसे अनुत्साहाचे सावट आले. मात्र, कोरोनाच्या काळातही हे दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आले.
मानसिक, भावनिक आणि आरोग्यविषयक चिंता आणि चिंतन, कोरोना काव्य कथा- कादंबरी आणि लेखन विपुल प्रमाणात झाले. ब्लॉग लेखन, वार्तापत्रे, ऑनलाइन वृत्तपत्र आवृत्त्या, दूरदर्शन, रेडिओ इत्यादी माध्यमांतून संवाद सुरू होता. साहित्यनिर्मिती, संवाद क्रिया, लेखनप्रक्रिया यांनी नवी दिशा घेतली. संवेदनशीलता हा साहित्यनिर्मितीचा मूलस्रोत असतो याची नव्याने जाणीव, जागृती झाली. महामारीने बोथट संवेदना अशा प्रचलित झाल्या, त्याच्या अनुभवाचा हा काळ ठरला. मानवतावादी-वैश्विक जाणिवा जोपासल्या गेल्या. महायुद्ध-अणुयुद्धानंतर प्रथमच शीतयुद्धाच्या जैविक विषाणुयुद्धाची चर्चा, स्वानुभव सध्या सारे विश्व घेत आहे. ‘कडीबंद’ कथासंग्रह (अशोक कोळी) आणि लॉकडाऊन (कादंबरी - श्रीकांत पाटील) यासारख्या आणि हजारो कवितांचे प्रसारण लक्षणीय ठरले. या काळात मला अनेक रेखाटने करता आली. ‘पंख पिसारा’ - बालकविता संग्रह, ‘प्रेमरंग’ (चित्र काव्यसंग्रह), ‘लोकरंगभूमी’ (अभ्यास ग्रंथ), ‘पाणी’ (दीर्घकाव्य) आणि ‘शेकडो अभंग’ काव्यरचना करण्यासाठी हा विजनवास उपयुक्त ठरला. काळाच्या हातचे माणूस बाहुले असतो हा जिवंत अनुभव दृढ झाला.