एल.एच.पाटील स्कूलने बांधकाम परवानगीसाठी सादर केले खोटे शपथपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:37 PM2018-09-06T14:37:44+5:302018-09-06T14:42:57+5:30
शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे.
अजय पाटील ।
जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी याबाबत मनपा नगररचना विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी नगररचना विभागाचे सहायक संचालक अनंत धामणे यांनी या शाळेचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थाध्यक्षांनी शाळेची बांधकाम परवानगी घेताना मनपा नगररचना विभागाला आराखडा सादर करताना, शिरसोली रस्त्यालगत शाळेपर्यंत १८ मीटरचा रस्ता तयार करून घेण्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर केले. तसेच या शपथपत्रात शाळेपर्यंत १८ मीटरचा रस्ता विकसित करण्याचे आश्वासन दिले. त्या आधारावरच मनपा नगररचना विभागाने या शाळेच्या बांधकामाला परवानगी दिली. मात्र, नाईक यांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी कुठलाही रस्ता अस्तित्वात नसतानाही हा रस्ता विकसित करण्यासंदर्भात संस्थाध्यक्षांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे म्हटले आहे.
रस्त्याच्या बांधकामापूर्वी शाळेच्या बांधकामासाठी का दिली परवानगी?
नगररचना विभागाने या शाळेच्या बांधकामासाठी परवानगी घेताना, आधी रस्त्याचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, ते बांधकाम न करताच नगररचना विभागाने बांधकामाला केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर परवानगी कशी दिली? तसेच मेहरूण शिवारात रस्ताच मंजूर नसेल तर शाळा प्रशासनाने १८ मीटरचा रस्ता कसा दाखविला? नगररचना विभागाचे तत्कालीन सहायक संचालक चंद्रकांत निकम यांनी या शाळेच्या बांधकामालाा परवानगी दिली आहे.
आमदार पटेल यांच्या निधीतून मंजूर केला रस्ता
एकीकडे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असताना आमदार चंदूलाल पटेल यांनी शहरातील रस्त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून २०१७ मध्ये शिरसोली रस्ता ते आदिनाथ हॉटेलपर्यंतच्या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. बांधकाम विभागाला निधीदेखील प्राप्त झाला होता.
शाळेच्या बांधकामाबाबत नाईक यांच्या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर चंदूलाल पटेल यांनी हे काम रद्द केले. तसेच हा निधी परत मागवून घेतला होता. मात्र, तरीही बांधकाम विभागाने हा रस्ता तयार केला नसतानादेखील रस्ता तयार झाल्याचे आपल्या कागदपत्रात दाखविले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे.
आराखडा तयार करणाऱ्या आर्किटेक्टला नोटीस
प्रशांत नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत मनपा नगररचना विभागाने मेहरूण शिवारातील ३५७ गटवर शाळेचा प्लॅन तयार करणाºया प्रकाश गुजराथी यांना ३१ आॅगस्ट रोजी नोटीस बजावली आहे. तसेच गुजराथी यांना यासंदर्भात सात दिवसांच्या आत समर्पक खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सात दिवसात खुलासा प्राप्त न झाल्यास त्यानंतर त्यांचे काहीएक म्हणणे न ऐकता थेट कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे.
मनपाने या जागेवर १८ मीटरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे तो गृहीत धरून मनपाला हा रस्ता आम्ही स्वखर्चाने विकसित करून देण्याबाबतचे पत्र सादर केले आहे. प्रशांत नाईक यांची तक्रार चुकीची असून, त्यांचा हेतू साध्य होत नसल्याने त्यांनी ही खोटी तक्रार केली आहे.
-एल.एच.पाटील, संस्थाध्यक्ष, एल.एच.पाटील शाळा