तीन स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्द, ९० हजाराचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:41+5:302021-07-25T04:15:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिधापत्रिका धारकांना कमी धान्य देणे, धान्य आले नाही असे सांगून त्यांना वंचित ठेवणे तसेच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिधापत्रिका धारकांना कमी धान्य देणे, धान्य आले नाही असे सांगून त्यांना वंचित ठेवणे तसेच धान्य साठ्यात तफावत यासह वेगवेगळ्या कारणांनी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणीत तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच काही दुकानांकडून ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्याचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी सरकारने घोषणा केली. तसेच मोफत धान्यही देण्याची घोषणा केली. मात्र अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही त्याचे गांभीर्य नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ लागली.
कोरोना काळातही धान्याचा लाभ मिळत नसल्याने अथवा इतर कारणांनी लाभार्थ्यांच्या तक्रारीनुसार तसेच नियमित तपासणी करण्यात येऊन अनेक दुकानांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
९२ दुकानांची अचानक तपासणी
जिल्ह्यात जून महिन्यामध्ये २४४ स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी करण्यात आली तर ९२ स्वस्त धान्य दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली. तसेच तक्रारी येत असल्याने पाच दुकानांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ३४१ दुकानांच्या तपासणीमध्ये ६५ दुकानांवर किरकोळ, १२ दुकानांमध्ये मध्यम दोष आढळून आले. तर चार दुकानांवर गंभीर दोष आढळून आले.
या दुकानांचा परवाना रद्द
वेगवेगळे दोष आढळून आल्याने १२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. या शिवाय तीन दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी, अमळनेर येथील साने गुरुजी विविध कार्यकारी सोसायटी, कानळदा येथील विश्वनाथ रामचंद्र भगीरथे या स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला. परवाना निलंबन व रद्द करण्याव्यतिरिक्त दोष आढळून आलेल्या उर्वरित दुकान मालकाकडून ९० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य मिळत आहे की नाही, या विषयी नियमित तपासणीसह अचानक तपासणी करण्यात आली. तसेच शिधापत्रिका धारकांच्या तक्रारीनुसारही तपासणी केली. या तपासण्यांमध्ये दोष आढळून आल्याने तीन दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला.
- सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी.