पत्नीला व्हीडीओकॉल करुन संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:07 PM2019-05-08T12:07:20+5:302019-05-08T12:07:43+5:30
आरएमएस कॉलनीतील घटना
जळगाव : ‘मी आता जिवंत रहात नाही’ असे सांगण्यासाठी पत्नीला व्हीडीओ कॉल करुन निखील पंकज शहा (३३, मूळ रा. डहाणू, जि. पालघर) या तरुणाने आपले जीवन संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पतीचा कॉल ऐकून धावत आरएमएस कॉलनीत घरी गेलेल्या पत्नीला निखील मृतावस्थेत आढळून आला. निखील याने गळफास घेतलेला नाही किंवा विष प्राशन केलेले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, व्हीसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील एका मोबाईल कंपनीत डिस्ट्रीब्युटर होता तर पत्नी खुशबू एमआयडीसीत एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला आहे. मंगळवारी पत्नी कामावर असताना निखील हा एकटाच घरी होता. दुपारी बारा वाजता निखील याने पत्नीला व्हीडीओ कॉल केला व मी मृत्यूला कवटाळतो आहे असे सांगितले.
घाबरलेल्या पत्नीने चुलत भाऊ कुणाल याच्याशी संपर्क साधून तत्काळ घर गाठले. पती मृतावस्थेत होता. निखील याने आत्महत्या केली की आजारपणामुळे मृत्यूचे संकेत मिळाले अन् त्याने तत्काळ पत्नीला माहिती दिली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पती-पत्नीत उडत होते खटके
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील व खुशबु यांच्यात काही दिवसांपासून खटके उडत होते. यापूर्वीही निखीलने खुशबूला फोनवरुन मी आत्महत्या करतो, असे सांगितले होते. निखीलला मायग्रेनचा त्रास होता, त्यामुळेही तो त्रस्त होता. त्यामुळे निखिलले आत्महत्या केली, की त्याचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय निकुंभ व तुषार विसपुते यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून डहाणू येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला आहे. निखील याच्या पश्चात आई, वडील,पत्नी व जश हा पाच वर्षाचा मुलगा आहे.