बहीण व मेहुण्याच्या जीवावर उठलेल्या शालकास जन्मठेप
By संजय पाटील | Published: September 21, 2022 08:41 PM2022-09-21T20:41:37+5:302022-09-21T20:41:47+5:30
वाटणीवरील हक्क सोडण्यासाठी चाकू मारला
अमळनेर (जि. जळगाव) : जमिनीच्या वाटणीवरून बहीण व मेहुण्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी शालक बाळकृष्ण रामभाऊ पाटील (रा.बात्सर ता.भडगाव, ह.मु. पुणे) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर. चौधरी यांनी बुधवारी हा निकाल दिला.
बहीण शांताबाई चैत्राम पाटील व तिचा पती चैत्राम पाटील (रा.जोगलखेडा ता.पारोळा) यांनी वाटणीतील जमिनीवरील हक्क सोडून द्यावा व दिवाणी दावे मागे घ्यावे, यावर बाळकृष्ण पाटील याच्याशी वाद सुरु होते. त्या वादातून ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाळकृष्ण याने जोगलखेडा येथे बहीण शांताबाई व तिचा पती चैत्राम पाटील यांच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात दोघे जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मात्र जोगलखेडा फाट्यावर त्याला एका व्यक्तीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अमळनेर जिल्हा व अतिरिक्त न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.