अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By विजय.सैतवाल | Published: July 12, 2023 08:04 PM2023-07-12T20:04:47+5:302023-07-12T20:06:43+5:30
भाजीपाला व्यवसायातून वाढली होती जवळीक
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : भाजीपाला व्यवसायातून जवळीक वाढून अनैतिक संबंध निर्माण झाले व वाद होऊन महिलेचा खून केल्याप्रकरणी सुरेश सुकलाल महाजन (५५, रा. रामेश्वर कॉलनी) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुरेश सुकलाल महाजन हा भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. हाच व्यवसाय करणाऱ्या वंदना गोरख पाटील या महिलेचादेखील होता. यातून दोघांमध्ये ओळख होऊन घरोब्याचे संबंध निर्माण झाले आणि त्याचे रुपांतर अनैतिक संबंधात झाले. त्यामुळे आरोपीचे महिला राहत असलेल्या तुळजामाता नगरातील घरी येणे-जाणे वाढले.
महिला एकटीच असल्याने वाढले येणे-जाणे
महिलेच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे महिला व तिचा मुलगा दीपक हे दोघेच घरी राहत होते. मुलाचे लग्न झाल्यानंतर तो पत्नीसोबत उदगीर येथे नोकरी निमित्ताने निघून गेला. त्यामुळे मयत ही घरात एकटीच राहत होती आणि आरोपी नेहमी तिच्या घरी येत असे.
वजन मापे, चाकू व ओढणीचा खुनासाठी वापर
२६ ऑगस्ट २०२१च्या रात्री याच परिसरात राहणारे रामलाल पवार यांच्याकडे दोघांनी ठेवलेले पैसे घेण्यासाठी महिला व सुरेश महाजन हे गेले. दोघेही जण पैसे घेऊन निघून गेले. त्याच रात्री महिलेच्या घरी महाजन याने अर्धा किलो वजनाच्या मापाने, चाकू तसेच ओढणीच्या सहायाने गळफास देत महिलेचा खून केला होता. या प्रकरणी महाजनविरुद्ध कलम ३०२नुसार गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी न्यायालयात कामकाज झाले. यात मयताचा मुलगा दीपक, साक्षीदार रामलाल पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. मयताचा मुलाने आरोपी व त्याची मयत आई वंदना हे बऱ्याच वर्षापासून पती-पत्नी सारखे राहत होते, असे जबाबात सांगितले. विशेष म्हणजे आरोपी व मयत रात्री सोबत असल्याने महिलेच्या अंगावरील जखमा कशाच्या व कशामुळे झाल्या व महिला कशामुळे मयत झाली, याचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश-१ एस.एस. सापटणेकर यांनी महाजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भा.द.वि. कलम ३०२ अन्वये आजन्म सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास असा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.